भिवापूर : तालुक्यातील नांद ग्रामपंचायतीत सत्ताधारी काँग्रेस गटाला मोठा धक्का बसला आहे. अतिक्रमणाच्या कारणावरून उपसरपंचासह तब्बल तीन सदस्य अपात्र ठरले आहेत. याबात अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी ३० जुलै रोजी आदेश दिले आहे.
२०१८ मध्ये नांद ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. यात थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचासह १३ सदस्य संख्या असलेल्या नांद ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्थित गट सत्तारूढ झाला. दरम्यान, सरपंच तुळसीदास चुटे यांच्यासह उपसरपंच भास्कर डेकाटे, सदस्य राखी डांगे, अर्चना काकडे, विजय रामटेके या पाच जणांचे गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण असल्याबाबत दिनकर मेंढुले व रवी आंबुलकर यांनी तक्रार नोंदविली होती. यावर अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांच्या न्यायालयात प्रकरण सुरू होते. दरम्यान, सुनावणी, साक्ष, पुरावे व अहवालाचे निरीक्षण केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी ३० जुलै रोजी उपसरपंच भास्कर डेकाटे, सदस्य राखी डांगे, अर्चना काकडे, विजय रामटेके यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१) (ज३) व कलम १६ अन्वये ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आले, असे आदेश दिले. सदर आदेशाची प्रत अद्याप तरी ग्रामपंचायतीला प्राप्त झाली नसल्याची माहिती ग्रामपंचायतीचे सचिव भास्कर शेरकी यांनी दिली.
--