लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा, संगीत आणि धडाधड फेकल्या जाणाऱ्या संवादांचा साभिनय खेळ आता पुन्हा एकदा रंगमंचावर रंगणार आहे. गेली नऊ-साडे नऊ महिने कोरोना टाळेबंदीने लामबंद झालेल्या नाट्यप्रयोगांची तिसरी घंटा पुन्हा एकदा निनादणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर महानगर शाखेच्या वतीने २४ जानेवारी रोजी लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात स्व. प्रकाश लुंगे स्मृती नाट्यमहोत्सवाचे आयोजन होत आहे. या महोत्सवात नागपूरसह इंदूर, चंद्रपूर व कोराडी येथील नाट्यप्रयोगांचा आस्वाद नागपूरकर रसिकांना घेता येणार आहे.
गेली नऊ-साडेनऊ महिने सांस्कृतिक कार्यक्रमांना शासकीय लगाम लागल्याने नाटकांच्या तालमी, नाट्यप्रयोग होऊ शकले नाहीत. मधला मार्ग म्हणून अनेकांनी ऑनलाईन नाट्यप्रयोगांचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रंगमंचापुढे असलेली प्रेक्षकांची प्रत्यक्ष उपस्थिती, उत्तम संवाद-अभिनयाच्या वेळी पडणारा टाळ्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांकडून मिळणारी दाद वा टीका यापासून कलावंत मुकले होते. नाटक ही प्रत्यक्ष सादरीकरणाची प्रक्रिया असल्याने ऑनलाईनमध्ये उत्साहाला उभारी येण्यास वावच मिळाला नाही. मात्र, आता पुन्हा एकदा नाटकांच्या तालमी रंगायला लागल्या आहेत. २४ जानेवारीला दुपारी १ वाजतापासून ते संध्याकाळी ६ वाजतापर्यंत सलग सहा एकांकिकांचा रसास्वाद नागपूरकरांना घेता येणार आहे. त्यात हेमेंदू रंगभूमीची ‘मधुशाला के कारागीर’, अभिनय कट्टाची ‘दी कॉन्शन्स’, प्राची दाणीचा ‘रमाई’ हा एकपात्री प्रयोग, रंगरसियाची ‘दो पगले और वो’, नाट्यभारती इंदूरची ‘आवाज’, अजित दिवाडकर यांचा एकपात्री प्रयोग ‘पडदा’, आम्ही चंद्रपूरकरची ‘दृष्टी’ आणि राष्ट्रभाषा परिवारची ‘टिटवाला का कुत्ता’ यांचा समावेश आहे.
प्रयोगांना सुरुवात
वास्तविक पाहता टाळेबंदीनंतर नागपुरात पहिला प्रयोग ‘शेगावीचा महायोगी’ या नाटकाचा झाला. हा व्यावसायिक प्रयोग होता. त्यानंतर नागपुरातूनच आणखी एका व्यावसायिक प्रयोगाची तयारी सुरू असून, यात नागपूर व मुंबईचे प्रथितयश कलावंत सहभागी होणार आहेत. मात्र, नाट्यस्पर्धांनीच नाट्यचवळीचे खरे रूप पुढे येत असते आणि अशा नाट्यस्पर्धांची तयारी सुरू झाली आहे.
तालमींना जागाच नाही
शासनामार्फत सांस्कृतिक क्षेत्रावरील टाळेबंदी उठविण्यात आली असली तरी नाट्यप्रयोगांच्या तालमीवरील अघोषित टाळेबंदी संपलेली नाही. शहरात बहुतांश नाटकांच्या तालमी कामगार कल्याण केंद्रांच्या सभागृहासोबतच अन्य शासकीय संस्थांच्या जागांवर होत असतात. सोबतच अन्य सार्वजनिक जागांवरही तालमींना अवकाश दिला जातो. मात्र, अजूनही तालमींना जागा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने रंगकर्मींच्या तयारीला फटका बसतो आहे. संक्रमणाचा धोका, हेच कारण सर्वत्र सांगितले जात आहे.