लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारने बाजारपेठेत फिरून सावज हेरल्यानंतर चोरी करणाऱ्या एका कुख्यात चोरट्याला तहसील पोलिसांनी अटक केली. संजोग लीलाधर होले (वय २०) असे आरोपीचे नाव असून तो टिमकी भागातील रहिवासी आहे. त्याच्याकडून चाैकशीत एकूण १० चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
खामल्यातील शैला दिनेश डवरे (वय ५१) पती आणि मुलीसह ९ जानेवारीला गांधीबागमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. मोबाईलवर बोलत असताना दुपारी ३.४५ च्या सुमारास त्यांच्या पर्समधून चोरट्याने बेमालूमपणे ८ हजारांची रोकड लंपास केली. या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर तहसील पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलचे ठाणेदार जयेश भांडारकर, द्वितीय निरीक्षक बलीरामसिंग परदेसी, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ यांनी चोरट्याचा माग काढणे सुरू केले. तेव्हा पोलिसांना चोरटा एका कारमध्ये बसताना दिसला. तो धागा पकडून पोलिसांनी बाजारपेठेत पाळत ठेवली. दोन दिवसांपूर्वी आरोपी होले महिंद्रा लोगन कार (एमएच ३१ - सीआर ५६८) मध्ये बसून संशयास्पद अवस्थेत बाजारपेठेत चकरा मारताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता तो अट्टल चोरटा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची कार, दोन दुचाकी, रोख ३ हजार तसेच विविध साहित्यासह ८ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
---
अल्पवयातच बनला गुन्हेगार
आरोपी होले कुख्यात गुंड आहे. त्याच्याविरुद्ध हत्येसह एकूण २८ गुन्हे दाखल असून अल्पवयीन असतानाच तो गुन्हेगार बनला. अलीकडे तो बाजारपेठेत कारने फिरून सावज हेरायचा आणि संधी मिळताच माैल्यवान दागिने लंपास करायचा. तो सध्या पीसीआरमध्ये असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
----