लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑक्सिजनमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने संसदेत दिले व त्यावरून राजकारण तापले. नागपूर जिल्ह्यातदेखील ऑक्सिजनअभावी मृत्यू झालेल्या रुग्णांची अधिकृतपणे नोंद झाली नाही. रुग्णाचा मृत्यू जरी ऑक्सिजनअभावी झाला असला तरी प्रत्यक्षात मृत्यू प्रमाणपत्रावर संबंधित आजाराच्या कारणाची नोंद होते. त्यामुळेच अधिकृतपणे एकाही रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नसल्याचा दावा प्रशासन करत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजनसाठी अक्षरश: धावाधाव झाली होती. खुद्द प्रशासनानेदेखील ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध राज्यांतून ऑक्सिजन यावे, यासाठी प्रयत्न केले होते. राज्य शासनानेदेखील विविध माध्यमांतून प्रयत्न केले. यामुळे काही प्रमाणात साठा उपलब्ध होऊ शकला होता. तरीदेखील अ़नेकांना वेळेवर ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही व त्यांना जीव गमवावा लागला. याबाबतीत रुग्णांच्या कुटुंबीयांकडूनदेखील आक्रोश झाला. परंतु प्रत्यक्षात सरकारदरबारी मात्र ऑक्सिजनअभावी मृत्यू हे कारणच नोंदविले गेले नाही. याबाबतीत लोकमतने विविध तज्ज्ञांना विचारणा केली असता याचे कारण समोर आले.
कुठल्याही शासकीय किंवा खासगी दवाखान्यात रुग्णाला भरती केल्यानंतर त्याची लक्षणे, आजाराचे नाव याची नोंद होते. त्यानुसार उपचाराला सुरुवात होते. उपचाराच्या कालावधीत ऑक्सिजनची कमतरता, वेळेत न झालेला रक्तपुरवठा इत्यादींमुळे रुग्णांचा जीव जाण्याचा धोका असतो. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर केसपेपरच्या समरीत ऑक्सिजन कमतरतेचा उल्लेख असला तरी मृत्यू प्रमाणपत्रावर मात्र संबंधित आजाराचे कारण दिले जाते. दुसऱ्या लाटेत कोरोनाचे कारण देण्यात आले. यासंदर्भात लोकमतने विविध तज्ज्ञांशी संपर्क केला. मात्र, प्रतिक्रिया छापू नका, असेच उत्तर मिळाले.
आरोप झाले, पण अधिकृत तक्रार नाही
रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक कुटुंबीयांनी ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे आरोप केले होते. आरोपांची संख्या जास्त असली तरी त्यानंतर त्यांनी हा मुद्दा लावून धरला नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची अधिकृत तक्रारच आली नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.
मग ती धावाधाव का होती
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ४ लाख ९२ हजार ८३६ रुग्ण आढळले. त्यातील ४ लाख ८२ हजार ९८ रुग्ण बरे झाले, तर १० हजार ११६ रुग्णांचा मृत्यू झाला. तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे ऑक्सिजनअभावी मृत्यू दाखविण्यात आले नाहीत. मात्र, एप्रिल व मे महिन्यात ऑक्सिजनअभावी जिल्ह्यात हाहा:कार उडाला होता. मेडिकल, मेयोच्या कॅज्युअल्टीमध्ये तर एकेका खाटेवर दोन रुग्ण होते व ऑक्सिजनची कमतरता होती. सर्व जगाला हे चित्र दिसले होते. रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू होती. मात्र, सरकारी यंत्रणेला कागदपत्रांवर ती धावाधाव दिसलीच नाही.