लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक वितरण प्रणालीत गोंधळ झाला असून गरीब जनतेला योग्य पद्धतीने धान्याचे वाटप झाले नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांना प्रचंड त्रास झाला, असा आरोप भारतीय जनता पक्षातर्फे लावण्यात आला आहे. यासंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन सादर केले.
भाजपच्या शिष्टमंडळात खा. विकास महात्मे, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. विकास कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कोरोनाच्या कालावधीत गरीबांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. दोन वेळच्या भोजनाची अडचण झाली आहे. त्यातच राज्य शासनाच्या अन्नधान्य वितरण प्रणालीतून योग्य पद्धतीने वाटप होत नाही. शहरातील २ लाख ६७ हजार रेशनकार्ड धारकांना धान्य मिळालेले नाही. जनतेच्या हितासाठी सरळ व योग्य पद्धतीने धान्य पुरवठा व्हावा अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली. सोबतच संजय बंगाले, रामभाऊ आंबुलकर, सुनील मित्रा, नगरसेवक, संजय बालपांडे हेदेखील उपस्थित होते.