नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय नागपूरने ‘दिवाळी ते दिवाळी, अंधाराला वावच नाही’ ही घडी पुस्तिका प्रकाशित केली आहे. या आकर्षक घडी पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. कोराडी येथे आयोजित एका कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनील केदार, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक मोहन राठोड व जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर शहर व जिल्ह्यात शासनाने वर्षभरात केलेल्या कामाचा ठळक व धावता आढावा या पुस्तिकेत घेतला आहे. मुखपृष्ठावरील प्रकाशाचे पाऊल आणि जलयुक्त शिवाराची पवसाने भरलेले सिमेंट बंधारे, सहापदरी रस्ते, नागपूरची वैशिष्ट्ये ठरू पाहत असलेली माझी मेट्रो हे छायचित्रे पाहताक्षणीच आकर्षित करतात. या घडीपुस्तिकेचे एकूण आठ भाग असून पहिल्या भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामाची माहिती सचित्र छायाचित्रांसह दिली आहे. त्यानंतर पीक कर्ज वाटपाच्या धडक मोहिमेची माहिती दिली आहे. सावकारी कर्ज माफी, शेती पंपासाठी वीज जोडणी, वीज जोडणीसाठी मदत आदी माहिती देण्यात आली असून नागपुरात राबविण्यात आलेल्या समाधान शिबिर, हागणदारीमुक्त नगर परिषद, शौचालय, घरकुल इत्यादी माहिती देण्यात आली आहे. नागपुरात होऊ घातलेल्या राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, मेट्रो रेल्वेच्या प्रगतिपथावरील कामे, नागपुरात सुरू झालेले आयआयएम तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स, स्मार्ट सिटी नागपूर, ट्रीपल आयटी, नागपुरातील सिमेंट काँक्रीटचे वळण रस्ते, स्मार्ट पोलीस ठाणे, नागपुरात सुरू झालेले रोबोटिक्स अभ्यासक्रम आदी माहिती सुद्धा या घडी पुस्तिकेत देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
दिवाळी ते दिवाळी अंधाराला वावच नाही
By admin | Updated: November 9, 2015 05:47 IST