उमरेड : सलग आलेल्या सुट्या आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरलेले काही तास यामुळे मंगळवारी एकाच वेळी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी उसळली. उमरेड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मंगळवारी सायंकाळपर्यंत १०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक २३ उमेदवारांचे अर्ज नवेगाव ग्रामपंचायतीमधून दाखल झाले. सदर ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, येथे ११ जागेसाठी निवडणूक होत आहे. खुर्सापार (बेला) या ग्रामपंचायतीसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. किन्हाळा ग्रामपंचायतसाठी दोन, बोरगाव (लांबट) येथून तीन, शेडेश्वर ग्रामपंचायतसाठी चार, सावंगी (खुर्द) आणि चनोडा ग्रामपंचायतमधून प्रत्येकी सहा, मटकाझरी ११, खुर्सापार (उमरेड) आणि शिरपूर येथे प्रत्येकी १४, तर विरली ग्रामपंचायतीसाठी १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे. तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक अर्ज दाखल झाले असले तरी सालईराणी, खैरी (चारगाव), कळमना (बेला) आणि सावंगी खुर्द या ग्रा.पं.साठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
चार ग्रा.पं.साठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:12 IST