नरखेड : नरखेड तालुक्यातील १७ ग्रा.पं.साठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या, बुधवार शेवटचा दिवस असतानाही तालुक्यातील १४७ जागांसाठी आतापर्यंत केवळ ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. त्यामुळे उद्या तहसील कार्यालयात उमेदवारासह त्यांच्या समर्थकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. तालुक्यातील ग्रा.पं.साठी अद्याप एकही अर्ज आलेला नाही. उमेदवारांनी केवळ अर्ज तपासून घेतले आहेत. इकडे इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तहसील कार्यालयात मंगळवारी गर्दी केली होती. खैरगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी २७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सर्वात लहान देवळी ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी आतापर्यंत केवळ १ उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या ग्रा.पं.मध्ये सायवाडा (११), येरला(इंदोरा)-११, माणिकवाडा (१०), देवळी (१), पेठईस्माईलपूर (६), मदना (५), जलालखेडा (१०), खैरगाव (२७), खरबडी ग्रा.पं.साठी ९ जणांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. खैरगांव ग्रामपंचायत सदस्यांसाठी दिव्यांग नंदकिशोर लक्ष्मण बनाईत यांनी प्रभाक क्र १ साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात अपक्ष उमेदवाराचा जास्त कल आहे.
--
नेत्यांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका स्वीकारल्यामुळे अजूनही सात ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले नाही. गावपातळीवरील राजकारणातील मुरब्बी कुणाविरुध्द कुणाला मैदानात उतरवायचे याचा काळजीपूर्वक अभ्यास करीत आहेत. शेवटच्या दिवशी सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल होतील.
-नरेश अरसडे, नरखेड तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस