जितेंद्र ढवळेनागपूर : पाण्यासाठी सार्वजनिक नळावर होणारी महिलांची भांडणं! गावात टँकर आल्यावर होणारी मारामार. हजार फूट बोअर करून पाणी लागेना हे चित्र ‘डार्क’ झोनमध्ये असलेल्या काटोल तालुक्यातील खुर्सापार गावाचे. भूजल पातळी ८८५ फुटांपर्यंत खोल गेलेले खुर्सापार आज पाणीदार झाले आहे.
गावात घरोघरी पाण्याचे नळ लागले आहेत. गावाचे बागायती क्षेत्र २० वरून आता १४० हेक्टर्सवर आले आहे. ही जादू एका दिवसात झाली नाही, तर साडेचार वर्षे सरपंच आणि ग्रामस्थांनी केलेल्या तपश्चर्येचे हे फळ आहे.इतकेच काय, तर अटल भूजल योजनेअंतर्गत केलेल्या कामासाठी रोल मॉडेल ठरलेल्या खुर्सापार ग्रामपंचायतीच्या कामाचे वर्ल्ड बँकेच्या चमूने केलेल्या कौतुकानंतर आता केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराजसिंग हेही खुर्सापारच्या मोहात पडले आहेत.१८०० लोकसंख्येच्या खुर्सापार ग्रामपंचायतीला साडेचार वर्षांपूर्वी ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी पाण्याची खरेदी करावी लागत होती. मात्र, २०१८-२०१९ मध्ये जलयुक्त शिवार, तसेच २०१९ ते २०२१ या काळात अटल भूजल योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या कामामुळे खुर्सापारचे चित्र पालटले आहे.गावाची भूजल पातळी वाढल्यानंतर एकेकाळी २० हेक्टर क्षेत्रात असलेले बागायती क्षेत्र आता १४० हेक्टर्सवर पोहोचले आहे. ग्रामपंचायतीने वॉटर बजेट आखत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात घरोघरी वॉटर टॅब बसविले आहे. इतकेच काय, तर गावातच उत्पन्नाची साधने तयार झाल्याने ग्रामस्थांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतरही थांबले आहे.
‘जलसमृद्ध ग्राम’ची संकल्पना वास्तवात साकारणाऱ्या या गावात आज चिल्ड्रेन पार्क, नाना-नानी पार्क, स्मृती उद्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्यानासोबतच अद्ययावत पंचायती राज प्रशिक्षण केंद्र साकारण्यात आल्याने नागपूर-अमरावती मार्गाजनीक जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले खुर्सासापार आज ग्रामसमृद्धीचा मध्यबिंदू ठरत आहे.
अशी आहे पाणीदार वाटचाल..
- २०१७-२०१८ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत शेवटच्या टप्प्यात खुर्सापारचा समावेश झाला. याअंतर्गत गावातील ५० हेक्टर, तर मौजा सालई येथील ४० हेक्टर परिसरात असलेल्या पाझर तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्यात आले. पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलावाचे लिकेज बुजविण्यात आले.- या परिसरातील २० बंधारे गाळमुक्त करण्यात आले. याशिवाय गावाशेजारी असलेल्या नाल्यांचे पाच ते सात किलोमीटरपर्यंत खाेलीकरण करून गाळ काढण्यात आला. या परिसरात ६ नवीन बंधारे बांधण्यात आले.
- केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेतून गावात १५० मॅजिक पीट तयार करण्यात आले. त्यामुळे घराघरांतील वेस्टेज पाणी जमिनीत मुरविणे सोईचे झाले.- गावातील सर्व १७ शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. यातून वर्षाला १ कोटी ८० लाख लिटर पाणी जमिनीत मुरविणे शक्य झाले आहे. याशिवाय गावात १० शेत तलाव करण्यात आले.
- २०१९ मध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाण्याचा कमी वापर करून शेती करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतीसाठी ठिबक आणि स्प्रिंकलरचा वापर करण्यात आला.
फ्लोरिडातील जलशास्त्रज्ञानेही केला रिसर्चअमेरिकेच्या फ्लोरिडा येथील जलशास्त्रज्ञ रवीचंद्र लोढा यांनी जानेवारी महिन्यात खुर्सापार येथे भेट देत येथील जलसंवर्धनाच्या कामांचा अभ्यास केला. भारतीय जलव्यवस्थापनावरील रिचर्स पेपरमध्ये त्यांनी खुर्सापार येथील कामांचा उल्लेख केला आहे.
जिथे पाण्यासाठी भांडण होत होती तिथे आज प्रेमाचे कारंजे उडताहेत. गावात भांडणे नाहीत म्हणून तंटामुक्त ग्रामचा पुरस्कार मिळाला. गावातील भूजल पातळी ८०० हून ३०० फुटांपर्यंत आल्याने समृद्धी आली. केवळ लोकसहभागाने हे शक्य झाले.
-सुधीर गोतमारे, सरपंच,ग्रामपंचायत खुर्सापार, ता. काटोल, जि. नागपूर