नागपूर : महिलांचा संघर्ष जन्मानंतर नाही तर गर्भातूनच सुरू होतो. सोनोग्राफीच्या रिपोर्टवरून ती असावी की नसावी यावरून वाद उठतो. जन्मानंतर तिला प्रत्येक अवस्थेत घरातून समाजापर्यंत संघर्ष करावा लागतो. ती कुठल्याही परिस्थितीत अथवा धर्मात जन्म घेवो, पुरुषप्रधान संस्कृतीच्या पडद्याआडच तिला जगावे लागले. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आज समाजात वावरत असली तरी परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे महिला आयोगासारखी यंत्रणा समाजात उभारावी लागत आहे. महिलांच्या व्यथा, वेदना, अन्याय, अत्याचार संपवायचा असेल, तर महिलांच्या बाबतीत समाजाची मानसिकता बदलावी लागेल, असा सूर लोकमत वूमन समिटमध्ये आयोजित परिसंवादात सहभागी मान्यवरांनी आळवला.
स्त्रीचे अस्तित्व, अभिव्यक्ती तिच्या नजरेतून जाणून घेण्यासाठी लोढा गोल्ड टीएमटी बार प्रस्तुत ‘लोकमत’तर्फे पिजन आणि निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. नागपूरच्या सहकार्याने लोकमत वुमेन समिटचे आयोजन करण्यात आले होते. या समिटमध्ये पटाखा गुडी शीर्षकांतर्गत आयोजित परिसंवादात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मुस्लिम महिला आंदोलनाच्या संस्थापक झाकिया सोमण, अभिनेत्री संजना संघी सहभागी झाल्या होत्या. परिसंवादाचे संचालन सुरभी शिरपूरकर यांनी केले.
- ‘लोकमत’ समाजाचे प्रश्न घेऊन पुढे चालतेय
लोकमत वुमन समिटच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांपुढील आव्हाने आणि त्यांचा संघर्ष ‘लोकमत’ उलगडत आला आहे. महिलांच्या अत्याचाराविरोधातील लढ्यात सदैव अग्रेसर राहिला आहे. महिलांकडे बघण्याच्या समाजातील विकृतीला सदैव ठेचून काढले आहे. महिलांच्या पुढील प्रश्न अनेक आहे. ‘लोकमत’ने आपल्या व्यासपीठावरून त्या प्रश्नांना सदैव हात घातला आहे. गणपती उत्सवातून महिलांना मान मिळवून दिला आहे. वुमन समिटसारख्या व्यासपीठावरून समाजाला महिलांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. सोनाराने कान टोचले की दुखत नाही. ‘लोकमत’ची ही भूमिका आजपर्यंत राहिली आहे आणि पुढेही राहावी.
- रूपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग
- तीन तलाकला विरोध हा मुस्लिम महिलांनी केलेला मोठा संघर्ष
तीन तलाकच्या विरोधात सामान्य मुस्लिम महिलांनी उठविलेला आवाज ही संघर्षाची ऐतिहासिक सुरुवात आहे. मुस्लिम महिलांच्या समस्यांचे प्रतिनिधित्व आजपर्यंत त्यांचे धर्मगुरूच करायचे. त्यांच्या धर्मग्रंथात महिलांना दिलेल्या अधिकाराची जाणीव करून देत त्यांचा आवाज दाबला जायचा. मुस्लिम महिलांच्या बाबतीत हिजाबला धर्माशी जोडले गेले आहे; पण हिजाब घालणे अनिवार्य नाही, धर्मात तसा उल्लेखही नाही; पण हिजाबवरून राजकीय रंग देण्याची गरज नव्हती. संबंधित कॉलेजला तो आपल्या स्तरावर सोडविता आला असता.
झाकिया सोमन, मुस्लिम महिला आंदोलनाच्या संस्थापक
- काय घालावे आणि काय नाही हे महिलांना समजते
समाजातून सदैव महिलांच्या वस्त्राबद्दल प्रश्न उपस्थित होतो; पण काय घालावे, काय नाही हे महिलांना समजते. परिस्थितीनुरूप वस्त्र परिधान करणे याबाबत पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त सजग असतात. वस्त्र परिधान करणे हा तिच्या आवडीचा विषय आहे. त्यावरून विनाकारण प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही.
संजना संघी, अभिनेत्री