अंत्यविधी थांबला : मरूपार पुनर्वसन व वीरखंडी धापर्ला येथे काही काळ तणावभिवापूर : मरूपार पुनर्वसन व वीरखंडी (धापर्ला) या दोन गावात स्मशानभूमीच्या जागेवरून उद्भवलेल्या वादामुळे मृतदेहाचा अंत्यविधी तब्बल १२ तास थांबला. दोन्ही गावातील नागरिक माघार घेत नसल्याने तेथे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, तहसीलदार शीतलकुमार यादव व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याने तणाव निवळला. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला वाद अखेर रविवारी दुपारच्या सुमारास संपुष्टात आल्याने मृताला गावातील स्मशानभूमीवर मूठमाती देण्यात आली. मरूपार पुनवर्सन येथील नामदेव इस्तारी वराडे (७०) यांचे शनिवारी दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले. अंत्यविधीच्या वेळेनुसार आप्तस्वकीय पोहोचले. वीरखंडी (धापर्ला) येथील बसस्थानकामागे स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अंत्यविधी करण्याचे ठरले. मात्र यास वीरखंडीच्या नागरिकांचा विरोध होता. रात्र झाल्याने सकाळी १० वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार होते. त्यानुसार रविवारी पुन्हा अंत्यविधीची तयारी झाली. दरम्यान, वीरखंडी गावातील ५० पेक्षा अधिक नागरिकांनी बसस्थानक परिसरात अंत्यविधी उरकण्यास मज्जाव केला तर दुसरीकडे पुनर्वसनातील नागरिकांनीही तेथेच अंत्यविधी पार पाडण्यासाठी ताठर भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांत वाद निर्माण झाल्याने तेथे काही काळ तणाव निर्माण झाला. याबाबत समजताच, तहसीलदार शीतलकु मार यादव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर गाडामोडे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दोन्ही गावातील नागरिक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. दुसरीकडे मृताच्या कुटुंबीयांची मात्र दु:खद प्रसंगी हेळसांड होत होती. तहसीलदार यादव यांनी पुनर्वसनातील नागरिकांना मृताचा अंत्यविधी करा, त्यानंतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. अंत्यविधी रखडल्याचे पाहून पुनर्वसनातील नागरिकांनी नरमाईची भूमिका घेतल्याने अखेर अंत्यसंस्कार पार पडले. (तालुका प्रतिनिधी) असा आहे जागेचा वादविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द प्रकल्पबाधित मरूपार या गावाचे पुनर्वसन राज्यमार्ग क्रमांक ९ लगतच्या वीरखंडी (धापर्ला) गावालगत केले आहे. पुनर्वसनस्थळावरील गट क्र. ७५/१ या आरक्षित जागेवर स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आली. मात्र ही स्मशानभूमी पुनर्वसन गावातील घरालगत असल्याने लहान मुले, महिला घाबरतात. त्यामुळे स्मशानभूमीची जागा गावाबाहेर देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा केली. यावर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने वीरखंडी येथील बसस्थानक मागील गट नं. ६३ मध्ये ०.२१ आराजी जागा आरक्षित केली. मात्र या जागेवर अंत्यविधी करण्यास वीरखंडी (धापर्ला) येथील नागरिकांचा विरोध आहे. अंत्यसंस्काराच्या जागेवरून या दोन्ही गावात वर्षभरापासून हा वाद सुरू आहे. --------प्रशासनाचे दुर्लक्षविदर्भ पाटबंधारे विभागाच्या गलथान धोरणामुळे हा वाद उद्भवला असून याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. पुनर्वसन गावातील घरांलगत स्मशानभूमी तयार केली. तेथे अंत्यविधी उरकल्यास लहान मुले व महिलांमध्ये भीती निर्माण होते. त्यामुळे दुसरी जागा आरक्षित केली, त्याला वीरखंडीवासीयांनी विरोध केला. त्यामुळे आम्ही प्रकल्पग्रस्त रस्त्यावर आलो आहेत. दु:खाच्या प्रसंगात मृत कुटुबीयांची फरफट होत असल्यानेच गावालगतच्या स्मशानभूमीत अंत्यविधी केला. परंतु या समस्येवर तत्काळ तोडगा काढला नाही, तर यापुढे राज्यमार्गावर अथवा तहसील कार्यालय आवारात अंत्यसंस्कार करू, असा इशारा प्रकल्पग्रस्त रामगोपाल मंगर, फुलचंद मंगर, संतोष शिंदे, मोतीराम मंगर आदींनी दिला.वीरखंडीवासीयांचा विरोध कायम पुनर्वसनातील घरांलगत स्मशानभूमी असल्याने वीरखंडी (धापर्ला) येथील बसस्थानक ाजवळील जागा आरक्षित करणे चुकीचे आहे. अंत्यसंस्कार कुणाचेही असो, ते गावाबाहेरच व्हायला पाहिजे. बसस्थानक परिसरात अंत्यसंस्कार होऊ नये याबाबत तहसीलदार शीतलकु मार यादव यांना अनेकदा निवेदने दिली. मात्र, प्रशासनातर्फे उर्मट वागणुकीशिवाय काही एक साध्य झाले नाही. शिवाय बसस्थानकालगतची जागा आरक्षित करताना ग्रामपंचायतला कुठलेही पत्र वा सूचना प्रशासनाने केली नाही. यापुढेही बसस्थानक परिसरात अंत्यविधी होऊ देणार नाही, असे मत उपसरपंच सचिन ठवकर, विलास धनविजय, बापुराव शंभरकर, राजेंद्र ठवकर यांनी व्यक्त केले.
स्मशानभूमीवरून दोन गावात वाद
By admin | Updated: September 21, 2015 03:27 IST