मेडिकलमधील दुष्कृत्य प्रकरण : चौकशी समितीचा ठपकानागपूर : मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य करणारा डॉक्टर सोमवारपासून बेपत्ता असलातरी या प्रकरणात तो दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. उद्या बुधवारी हा अहवाल ‘पीजी’ विद्यार्थ्यांच्या समितीसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या एका १४ वर्षीय मुलीची सोनोग्राफी करीत असताना डॉ. पंडित पाचोरे नावाच्या डॉक्टराने अत्याचार केल्याचा आरोप आहे. शनिवारी झालेल्या या घटनेची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्या आधारे पोलिसांनी डॉ. पाचोरेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर काही तासांतच डॉ. पाचोरे अटक होण्याच्या भीतीने फरार झाला. वैद्यकीय पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेने मेडिकल प्रशासन चांगलेच हादरले. डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन केली. एका दिवसात चौकशीचा अहवाल देण्याचे निर्देशही दिले. तत्पूर्वी डॉ. पाचोरेला चौकशी समितीसमोर उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाने त्याच्या घरी नोटीसही पाठविली होती. परंतु, डॉ. पाचोरे चौकशी समितीसमोर हजर झाला नाही. समितीने एक दिवस वाट पाहून घटनेची चौकशी करून मंगळवारी अहवाल अधिष्ठात्यांकडे सोपविला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पाचोरेला दोषी ठरविण्यात आले असून, त्याच्याविरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. समितीचा अहवाल उद्या बुधवार १ आॅक्टोबरला ‘पीजी’ विद्यार्थ्यांच्या समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर डॉ. पाचोरेवर अंतर्गत कारवाईसंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)
‘तो’ डॉक्टर दोषी
By admin | Updated: October 1, 2014 00:45 IST