योगेश पांडेनागपूर : वासनांध समुपदेशकाच्या कुकृत्यांची बाब समोर आल्यानंतर सरकारदरबारीदेखील खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीदेखील याची गंभीर दखल घेतली आहे. आरोपी विजय घायवटने कट रचूनच प्रत्येक अल्पवयीन मुलीला स्वत:च्या जाळ्यात ओढले. विशेष म्हणजे एकीकडे अल्पवयीन मुलींची छळवणूक करणारा हा नराधम समाजात दुतोंडी चेहरा घेऊन वावरायचा. अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जागृतीचा फार्सदेखील करायचा. लोका सांगे ब्रह्मज्ञान अन् स्वत: कोरडे नव्हे तर काळे पाषाण असेच त्याचे व्यक्तिमत्त्व असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे.
उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घायवटने २०११ साली मनोविकास माइंड डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना केली होती. समुपदेशनासोबतच सेंटरमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे थेरपी, टेस्टिंग अन् ट्रेनिंंग करत व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यात येतील, असा दावा त्याने केला होता. सोबतच तो अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत समुपदेशन करण्याची बतावणी करायचा. त्याने सोशल माध्यमांवर तशा पोस्टदेखील टाकल्या होत्या. या अत्याचारांमुळे अल्पवयीन मुली-मुलांमध्ये काय बदल होतात, त्यांच्यात काय नकारात्मक बाबी निर्माण होतात, यावर तो समुपदेशन करण्याचे नाटक करायचा. सोबतच अल्पवयीन मुला-मुलींमधील अनेक आरोग्यविषयक समस्या या लहानपणी झालेल्या अत्याचारामुळेच निर्माण होतात, असे तो सांगायचा. प्रत्यक्षात अशा गोष्टी करत तो अल्पवयीन मुलींमध्ये स्वत:बाबत विश्वास निर्माण करायचा आणि त्यानंतर केसानेच त्यांचा गळा कापून आयुष्य नासवायचा.
आरोपीनेच सांगितली होती ‘रेपिस्ट’ची ‘सायकोलॉजी’
अनेकदा शिबिरांमध्ये विद्यार्थिनींशी बोलताना तो लैंगिक अत्याचारांबाबत भाष्य करायचा. त्याने ‘रेपिस्ट’ची ‘सायकोलॉजी’ काय असते हेदेखील त्यांच्यासमोर मांडले होते. लैंगिक अत्याचार करणारा मानसिकदृष्ट्या विकृत असतो व असा विचार मनात येणे हीदेखील मोठी विकृतीच असल्याचे तो म्हणायचा. कुठलाही व्यक्ती ‘रेपिस्ट’ होण्यामागे पाच कारणे असतात अशी त्याने पोस्ट टाकली होती. त्यात पॉर्न ॲडिक्शन, दारू-ड्रग्जचे व्यसन, इगो, अतिशय राग किंवा पजेसिव्हनेस आणि सेक्शुअल फ्रस्टेशन यांचा समावेश असल्याचा दावा त्यात त्याने केला होता. आता घायवट हा स्वत:च विकृत असल्याची बाब जगासमोर आली आहे. त्यामुळे समुपदेशकाचा सैतान होण्यामागे काय कारण आहे याचा पोलिसांनी शोध घेणे आवश्यक आहे.
आयुष्य कुणाचे खराब होतेय ?
घायवटने सोशल माध्यमांतूनदेखील त्याच्या केंद्राचा प्रचार - प्रसार केला होता. मुलांच्या वागणुकीत झपाट्याने बदल होतोय, नंतर काय ? आयुष्य कुणाचं खराब होत आहे ? असा संदेश देणारे त्याने डिझाइन्स तयार केले होते. मात्र प्रत्यक्षात त्यानेच अनेक अल्पवयीन मुलींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून आयुष्य नासवले.