उर्वरित हत्ती सध्या गडचिरोलीतच राहतील; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: September 8, 2022 01:05 PM2022-09-08T13:05:24+5:302022-09-08T13:07:13+5:30
उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतल्यामुळे सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत गेले आहे.
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित हत्ती पुढील काही दिवस गुजरातला स्थानांतरित केले जाणार नाहीत, अशी माहिती राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. त्यामुळे न्यायालयाने हत्ती स्थानांतरणाला स्थगिती न देता या प्रकरणावर येत्या गुरुवारी पुढील सुनावणी निश्चित केली.
न्यायालयाने यासंदर्भात स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. वन विभागाच्या आदेशानुसार आतापर्यंत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील १३ पैकी ९ हत्ती गुजरातमधील जामनगर येथे स्थानांतरित करण्यात आले आहेत. उर्वरित चार हत्ती सिरोंचा वन विभागांतर्गत येणाऱ्या कमलापूर येथील सरकारी हत्ती कॅम्पमध्ये आहेत.
हे हत्ती स्थानांतरित करण्याला विविध पर्यावरण व सामाजिक संस्थांकडून विरोध होत आहे. कमलापूर ग्रामपंचायतने याविरुद्ध ठरावही पारित केला आहे. असे असताना हत्ती स्थानांतरित करण्याची तयारी सुरू केली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतल्यामुळे सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत गेले आहे.