नागपूर : ऑगस्ट महिन्यात सहसा आकाश ढगांनी व्यापले असते. सध्या मात्र पावसाचा जाेर कमी आहे व निरभ्र आकाशातून सर्यदर्शन हाेत आहे. अशा निरभ्र आकाशात इतर ग्रहांचे दर्शन करण्याची संधीसुद्धा मिळत आहे. साैरमालेतील पाच माेठे ग्रह पृथ्वीवरून डाेळ्यांनी पाहण्याची संधी आहे. पूर्वेकडे बुध, गुरू, शुक्र, शनि आणि पश्चिमेकडे मंगळ ग्रहाचे विलाेभनीय दर्शन घडत आहे.
या अनोख्या खगोलीय घटनेचे साक्षीदार व्हावे असे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे. ९ ऑगस्ट पासून सर्व पाच ग्रहांचे दर्शन हाेत आहे. पहाटे पूर्व आकाशात बुध ग्रह, सोबत जरा वर गुरु व शूक्र ग्रह बघता येताे, तर सायंकाळी पश्चिमेस मंगळ आणि रात्री १० वाजता नंतर पूर्वेकडे शनी ग्रहाचे दर्शन हाेत आहे. याशिवाय दक्षिण आकाशात अगस्तोदय झाला आहे. गेल्या पावणे तीन महिन्यांपासून लुप्त असलेला अगस्त्य तारा मनमोहक दर्शनास सज्ज असुन श्रावण पौर्णिमेचा चंद्र गरुड तारका समूहातील श्रवण नक्षत्रात बघता येईल.
मंगळवारी १२ तारखेला रात्री दहा नंतर पूर्व आकाशात अंगारकी चतुर्थीला मीन राशीत चंद्र आणि शनी ग्रह यांची युती घडणार आहे. तसेच पहाटे सर्वात मोठा ग्रह गुरु व सर्वात तेजस्वी शूक्र ग्रह युती स्वरूपात मिथुन राशीत अगदी जवळ असतील. दोन महाग्रहांची युती एक अपूर्व अनुभूती असेल. १२ व १३ राेजी पूर्व आकाशात कृत्तिका नक्षत्राच्या जवळ ययाती तारका समूहातून विविध रंगांच्या उल्का पडताना दिसतील, पहाटे यांचे प्रमाण वाढून दरताशी ९० पर्यंत राहील.
स्वातंत्र्याची पूर्वसंध्या म्हणजे १४ ऑगस्ट रोजी चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर कमी राहणार आहे. ३,६९,३०० कि.मी.एवढ्या कमी अंतरावर असल्याने चंद्र जरा आकाराने मोठा दिसेल. स्वातंत्र्य दिनी पहाटे ५.१७ ते ५.२२ या वेळात आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनची सलामी हाेईल. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन लखलखत्या चांदणीच्या स्वरूपात नैॠत्य ते ईशान्येस नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. खगाेल अभ्यासक, विद्यार्थी व नागरिकांनी आकाशातील घडामाेडींचे अवलाेकन करावे, असे अवाहन प्रभाकर दाेड यांनी केले आहे.