लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असून, हा आग्रह म्हणजे भारतीय महिलांना पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचे षडयंत्र होय, असे प्रतिपादन जेएनयुच्या प्रा. डॉ. विमल थोरात यांनी येथे केले. कामठी मार्गावरील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंन्शन सेंटर येथे शनिवारी आयोजित जागतिक रिपब्लिकन महिला परीषदेत त्या बोलत होत्या.
परीषदेचे उद्घाटन पीपल्स एज्युकेशन सोसायटी, छत्रपती संभाजीनगर येथील सेवानिवृत्त ग्रंथपाल मालती वराळे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, दीपा श्रावस्ती, पुष्पा वैद्य, सुमेधा राऊत, प्रा.गौतमी खोब्रागडे आदी विचारपीठावर होते.
डॉ. थोरात म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब म्हणायचे की शिक्षणाशिवाय दुसरे मौलीक धन कोणतेच नाही. आज आपण याच विद्याधनाच्या आधारावर आपली नेत्रदिपक प्रगती होत आहे. मागासवगींयांच्या शिक्षणात गळती होत आहे. शिवाय महिलांबद्दलचा तिरस्कारही कमी झालेला नाही.
राही भिडे म्हणाल्या, महाराष्ट्रासारख्या प्रगत व पुरोगामी राज्यात महिला मुख्यमंत्री होऊ शकल्या नाहीत. उत्तरप्रदेश, बिहार, जम्मु काश्मीर, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात महिलांना संधी मिळाली.
मालती वराळे म्हणाल्या, बाबासाहेबानंतर रिपब्लिकन चळवळीला बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांनी न्याय मिळवून दिला. महिलांची चळवळ पुढे नेऊन मोठी शक्ती निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सुषमा भड, पुष्पा बौध्द, प्रा. गौतमी खोब्रागडे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक छाया बेहरे-खोब्रागडे यांनी केले. कल्पना मेश्राम यांनी उद्देशिकेचे वाचन, संचालन तक्षशिला वाघधरे आणि आभार जयश्री गणवीर यांनी मानले.
उद्घाटन सत्रानंतर 'आंबेडकरी चळवळीत महिलांचे योगदान आणि महिलांचे संवैधानिक अधिकार व आजचे वास्तव'यावर परीसंवाद झाला. सुजाता लोखंडे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यानंतर शोभा गौतम पाटील यांनी 'मी रमाई बोलतेय'हा एकपात्री प्रयोग सादर केला. सायंकाळी झुंजार महिला कार्यकर्त्यांचा सत्कार, कवी संमेलन झाले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी लीला चितळे यांच्या उपस्थितीत परीषदेचा समारोप झाला. या सत्राचे संचालन सरिता सातारडे, आभार वर्षा शामकुळे यांनी मानले.