अजय मेहता : म्यूर मेमोरियल सोसायटी व इंडियन कॅन्सर हॉस्पिटलतर्फे जनजागृती नागपूर : गुटखा, तंबाखू व सिगारेटच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण कॅन्सरग्रस्तांपैकी ४० टक्के रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होतो. त्यामुळे या पदार्थांचे सेवन बंद करून दरवर्षी नियमित चाचणी करणे आवश्यक आहे; तेव्हाच कॅन्सरवर नियंत्रण मिळवता येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध आॅन्कोलॉजी तज्ज्ञ व इंडियन कॅन्सर सोसायटीचे सहसचिव डॉ. अजय मेहता यांनी केले. इंडियन कॅन्सर सोसायटी व म्यूर मेमोरियल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.मेहता म्हणाले, भारतात कॅन्सरविषयी जनजागृती नाही. इतर प्रगत देशांमध्ये सामान्य नागरिक नियमितपणे तपासणी करतात. त्यामुळे कॅन्सर असो वा इतरही आजारांची माहिती पहिल्याच स्टेजमध्ये मिळते. त्यावर नियमित औषधोपचार करून कॅन्सरसारखे आजार बरे होतात. मात्र, याबाबत भारतात अद्याप जनजागृती नसल्यामुळे येथील कॅन्सरचे प्रमाण जास्त असल्याचे डॉ. मेहता म्हणाले. इंडियन कॅन्सर सोसायटीचे सचिव डॉ. मनमोहन राठी म्हणाले, कॅन्सरग्रस्तांनी नियमित व्यायाम व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. शरीर संतुलित असल्यास कॅन्सरशी लढा देणे शक्य होते. यावेळी इंडियन कॅन्सर सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. व्ही. एन. मानेकर, म्यूर मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक विलास शेंडे व संजीवन बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष बबिता सोनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला संजीवन बहुउद्देशीय संस्थेच्या ५० महिला व म्यूर मेमोरियल हॉस्पिटल व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सोसायटीच्यावतीने सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत जनजागृतीकरिता चित्रप्रदर्शन लावण्यात आले होते. इंडियन कॅन्सर सोसायटीचे सदस्य नरेंद्र सतिजा यांनी संचालन करून आभार मानले. (प्रतिनिधी)
कॅन्सरची नियमित चाचणी करा
By admin | Updated: February 5, 2015 01:09 IST