खापरखेडा : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा जमाव शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास खापरखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात गोळा झाला होता. दरम्यान पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यातच पोलिसांनी ठाण्याचे गेटही बंद केले होते.हरीश गायकवाड व त्याचा चुलत भाऊ आशिष गायकवाड दोघेही रा. दहेगाव (रंगारी), ता. सावनेर हे गहू खरेदी करण्यासाठी दहेगाव येथील दुकानात जात होते. ते दोघ्ोही सरपंच चौधरी यांच्या घरासमोरून जात असताना सरपंचाचे पती किशोर चौधरी आणि त्यांचे सहकारी सुभाष चौधरी यांनी हरीश व आशिष यांच्याशी वाद घालून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर मारहाणही केली. या प्रकरणी बेबी सुरेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी शनिवारी दुपारी या प्रकरणी भादंवि ३५४ (अ),३ (१) (११) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यातच शनिवारी सायंकाळी दहेगाव येथील अंदाजे १०० नागरिक खापरखेडा पोलीस ठाण्यात आले होते. (प्रतिनिधी)
पोलीस ठाण्याच्या आवारात तणाव
By admin | Updated: April 26, 2015 02:21 IST