नागपूर : मागील २४ तासांमध्ये नागपुरातील तापमान किंचित घटले आहे. दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू असल्याने तापमान कमी असले तरी वातावरणातील उकाडा मात्र कायम आहे.
नागपुरात शनिवारी रात्रीच्या तापमानात वाढ झालेली होती. दोन दिवसांपूर्वीच्या पावसामुळे शुष्कता वाढल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. सकाळी आर्द्रता ६१ टक्के नोंदविली गेली. सायंकाळी मात्र यात घट होऊन ती ४३ पर्यंत घसरली. यामुळे दिवसभरात उकाडा जाणवत होता. शहरातील तापमान ३९.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यात ०.१ अंशाने घट झाली आहे.
विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपुरात असून, ते ४२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्या खालोखाल अकोला तापलेला होता. तिथे ४० अंश सेल्सिअसची नोंद झाली. यासोबतच, बुलडाणा आणि वाशिममध्ये ३८, अमरावती ३८.८, गडचिरोली आणि वर्धा ३९.२, बुलडाणा ३९.५, तर गोंदियामध्ये ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.