विराज देशपांडे
नागपूर : जगात सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या दहा ॲपमध्ये समावेश असलेले टेलेग्राम ॲप अवैध कारवायांचे केंद्र झाले आहे.
या ॲपचा उपयोग मेसेज व डेटा पाठविण्यासाठी करणे अपेक्षित आहे; परंतु काही गुन्हेगार हे ग्राहकांना लुटण्यासाठी या ॲपचा वापर करीत आहेत. जगातील १०० कोटी नागरिकांनी टेलेग्राम ॲप डाऊनलोड केले आहे. या ॲपवरून कोणत्याही आकाराची मीडिया फाइल पाठविता येते. त्यामुळे हे ॲप अल्पावधितच लोकप्रिय झाले. भारतातील नागरिकांनी मोठ्या संख्येत या ॲपचा उपयोग सुरू केला. ॲपवरील चॅनल जॉईन करून चित्रपट, मालिका व ऑनलाइन व्याख्याने पाहता येतात. त्या दृष्टिकोनातून ॲप चांगले आहे; पण काही समाजकंटक गुन्हेगारी कृत्यासाठी या ॲपचा वापर करीत आहेत. त्यात क्रिकेट बुकी व ड्रग्ज विक्रेते अशा धोकादायक गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांनी क्रिकेट बेटिंग, गांजा अशा नावाने चॅनल तयार केले आहेत. समाजकंटक विविध आमिषे दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूकही करीत आहेत. कठोर कारवाई होत नसल्यामुळे ॲपवर सर्रास अवैध कारवाया सुरू आहेत.
नागपूर कनेक्शन
ॲपवर केवळ नागपूर शोधले तरी क्रिकेट बुकी चॅनल पुढे येते. या चॅनलवर रोज आयपीएल क्रिकेट बेटिंगचे रेट दिले जातात. ॲडमिन टिप्स देण्यासाठी पैशांची मागणी करतो. त्या टिप्सचा बेटिंगकरिता उपयोग केला जातो. पोलिसांना कारवाई करायची असल्यास चॅनल जॉइन करावे लागेल. ॲडमिनकडून टिप्स मागावी लागेल. ॲडमिन ऑनलाइन व्यवहारासाठी बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक देईल. त्यानंतर गुन्हेगाराला पकडता येईल.