लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय मूल्याधारीत जीवनपद्धती ही जगात श्रेष्ठ म्हणून मानली जाते. ही मूल्ये शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांमध्ये रुजविण्याचे काम बाबा नंदनपवार यांनी केले. एक प्रयोगशील शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. ज्ञानासोबत ही मूल्ये रुजविण्याचे काम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी जाणले. त्यानुसार वेगवेगळ्या प्रयोगातून विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालक आणि शिक्षकांनाही घडविण्याचे काम त्यांनी केले, असे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले.डॉ. बाबा नंदनपवार यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विदर्भ गौरव प्रतिष्ठान व कै. म. ल. मानकर शैक्षणिक विकास व सेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले. साई सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमात कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी, अॅड. प्रकाश सोमलवार, डॉ. गिरीश गांधी, अशोक मानकर, सत्यनारायण नुवाल, प्रियंका ठाकूर, बंडू राऊत व नंदनपवार यांच्या पत्नी सुवर्णा नंदनपवार प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी ४५ वर्षाचा परिचय असल्याचे नमूद करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नंदनपवार संघ आणि जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून काम करीत असताना त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचा आग्रह करण्यात आला, मात्र त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी नम्रपणे ती संधी नाकारल्याचे ना. गडकरी यांनी नमूद केले. नवयुग शाळेत शिकविताना नंदनपवार चौकटीबाहेरचा विचार करणारे शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पुरातन काळातील गुरुकुलाची परंपरा नव्याने रुजविण्याचे काम केले. विद्यार्थ्यांसोबत पालक व शिक्षकांना प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याने त्यांनी पालकांसोबत शिक्षकांची व मुख्याध्यापकांच्या शाळेचाही उपक्रम राबविला. संघाचे संस्कार स्वीकारलेल्या नंदनपवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सर्व स्तरातील माणसांपर्यंत चांगले शिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न केल्याचे मनोगत व्यक्त केले.यावेळी वेदप्रकाश मिश्रा यांनी, पुरातन काळात असलेल्या ऋषिंच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत, मात्र बाबा नंदनपवार हे आपण पाहिलेले आधुनिक ऋषी असल्याचे मनोगत व्यक्त केले. नंदनपवार हे अहंकार व अपेक्षेच्या दु:खापासून मुक्त आहेत. देशाचे भविष्य हे शाळेच्या वर्गखोल्यात निर्माण होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर हे विधान सत्य वाटत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले.
नंदनपवार ज्ञानासोबत मूल्याधिष्ठित व्यक्ती निर्माण करणारे शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:08 IST
भारतीय मूल्याधारीत जीवनपद्धती ही जगात श्रेष्ठ म्हणून मानली जाते. ही मूल्ये शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांमध्ये रुजविण्याचे काम बाबा नंदनपवार यांनी केले.
नंदनपवार ज्ञानासोबत मूल्याधिष्ठित व्यक्ती निर्माण करणारे शिक्षक
ठळक मुद्देनितीन गडकरी : बाबा नंदनपवार यांचा अमृत महोत्सवी सत्कार