शिक्षकांमध्ये भीतीयुक्त वातावरण : शिकविण्यावर परिणाम नागपूर : शिक्षण संस्थाचालक असलेल्या दोन भावांच्या वर्चस्वाच्या वादामुळे संस्थेतील शिक्षकांची हेळसांड होत आहे. या वादात कुणाचे ऐकावे आणि कुणाचे नाही, असा प्रश्न शिक्षकांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीयुक्त वातावरण असून त्यांच्या शिकविण्यावर त्याचा परिणाम होत असल्याची बाब येथील मुख्याध्यापकांनीच उघडकीस आणली आहे. बेझनबाग येथील कामठी रोडवर नागसेन शिक्षण संस्थेअंतर्गत नागसेन विद्यालय, आदर्श कन्या शाळा आणि आदर्श नागसेन मराठी प्राथमिक शाळा या तीन शाळा चालविल्या जातात. या संस्थेच्या सचिव पदावरून सध्या रूपक जांभुळकर आणि मोरेश जांभुळकर या दोन भावांमध्ये वाद सुरू आहे. या वादात मात्र येथील कर्मचारी भरडल्या जात आहे. दोन्ही भावांचे स्वतंत्र कार्यालय आहे. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ते शिक्षकांना कुठल्या ना कुठल्या कारणाने कार्यालयात बोलावून घेतात. मस्टर मागवितात. एकाच्या कार्यालयात गेल्यास दुसऱ्याला राग येतो. रूपक जांभुळकर यांनी अनेक शिक्षकांना कामावरून काढून टाकले आहे. इतरही शिक्षकांना ते नेहमी नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत असतात. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापकांकडे दाद मागायला गेल्यास मुख्याध्यापकांनीही नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे. अशा परिस्थितीत येथील शिक्षकांना नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या दोन्ही भावांचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. जि.प. शिक्षणाधिकाऱ्यांपासून तर धर्मदाय आयुक्तांपर्यंत हा वाद गेला आहे. धर्मदाय आयुक्तांकडे अनेक बदल अर्ज न्यायप्रविष्ट असल्याने नागसेन शिक्षण संस्थेत सचिव कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा शिक्षणाधिकाऱ्यांपासून तर शिक्षण उपसंचालकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधात शिक्षकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंती येथील नागसेन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अमोल गोस्वामी, आदर्श नागसेन मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुमेध फुलझेले आणि आदर्श कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका एल.एन. डोंगरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
संस्थाचालकांच्या वादात शिक्षकांची हेळसांड
By admin | Updated: May 30, 2015 02:50 IST