नागपूर : अमेरिकेने भारतावर लावलेल्या अतिरिक्त टॅरिफसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जगातील काही देश सातासमुद्रापार आहेत. त्यांच्याशी आपला थेट संबंधदेखील येत नाही. मात्र, जर भारत मोठा झाला तर आमचे काय होईल, आमचे स्थान कुठे असेल भीतीने ते अस्वस्थ होतात. याच भीतीतून टॅरिफ लावण्यात आला आहे, असे सरसंघचालक म्हणाले.
ब्रह्माकुमारीजच्या जामठा येथील विश्वशांती सरोवरच्या वार्षिक उत्सवादरम्यान ते शुक्रवारी बोलत होते.
आज वेगवेगळ्या ठिकाणी वाद दिसून येतात. अगदी व्यक्तीपासून ते राष्ट्रांपर्यंतच्या वादाचे मूळ कारण हे आम्हाला पाहिजे व मला पाहिजे ही विचारधारा आहे. जेव्हा सर्व आमचे भाऊ आणि बहीण आहेत हे भाव असतात तेव्हा कलह निर्माण होत नाहीत. असेही भागवत म्हणाले.
आत्मीयतेची भावना असेल तर आपला कोणी शत्रू नसतो
जर आपल्या मनात आत्मीयतेची भावना असेल तर आपला कुणीच शत्रू नसतो. मी, माझे याच विचारातून जगातील इतके वाद वाढतात, असे सरसंघचालक म्हणाले. व्यक्ती आणि देशांना त्यांचे खरे स्वरूप समजणार नाही तोपर्यंत त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागेल.
भारत महान, भारतीयांनीही ज्ञानयुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
विचारांचा दृष्टिकोन मी वरून आपल्यावर बदलला तर अनेक समस्या दूर होतील. भारत जगाच्या समस्यांवर उपाय शोधण्यास व पुढे जाण्याचा मार्ग दाखविण्यास सक्षम आहे. भारत महान आहे आणि भारतीयांनीही ज्ञानयुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेदेखील ते म्हणाले.