आशिष साैदागर
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : गावखेड्यातील छाेटे-माेठे तंटे मिटवून गावात शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव याेजना अमलात आणली; परंतु या याेजनेला लागलेली घरघर पाहता शासनाच्या या लाेककल्याणकारी याेजनेला पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत.
गावातील तंटे गावातच मिटून गावकऱ्यांचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव याेजना कार्यान्वित केली. या बहुआयामी योजनेला आघाडी सरकारमध्ये घरघर लागली होती; परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये तरी नवसंजीवनी मिळण्याच्या प्रतीक्षेत ही योजना गावखेड्यापासून आणखी दूर लोटली गेली. त्यामुळे गावागावांत समित्यांची बसलेली घडी आता विस्कळीत झाली आहे. मध्यंतरी गाव समिती अध्यक्षपदासाठी राजकीय रस्सीखेच बघायला मिळाली. विशेष म्हणजे गृहविभाग राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वाट्याला असल्याने मरगळ आलेल्या या योजनेला बूस्टर मिळेल, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.
परंतु निधीची कमतरता, मार्गदर्शनाचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे पुढील वर्षात या माेहिमेचे विसर्जन हाेण्याची शक्यता आहे. गेल्या १० वर्षांच्या काळात गृहविभागाने एकही नवीन परिपत्रक या याेजनेतील कार्यक्षमता वाढविण्याबाबत काढले नाही. याेजनेचे इतर पुरस्कार रखडले आहेत. पुरस्कार रकमेच्या विनियाेगातून पुरस्कारप्राप्त गावांनी विविध विकासकामे केली; परंतु कामातील सातत्य अधिक काळ टिकले नाही आणि या तंटामुक्त गाव माेहिमेच्या प्रारंभीची पाच वर्षे वगळता नंतर नांगी टाकली. परिणामी लहानसहान वादविवाद पुन्हा पाेलीस ठाणे गाठत आहेत.
.....
गावातील वाद पाेलीस ठाण्यात
गावखेड्यात लहान-मोठे तंटे गावातच मिटवून गाव पातळीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेमुळे पाेलीस ठाण्यात तक्रारी करण्याचे प्रमाण कमी झाले होते. काही प्रमाणात का होईना तक्रारी करण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे पोलिसांचा भार हलका झाला होता. आता या योजनेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पुन्हा नागरिक पाेलीस ठाण्यात धाव घेतात. गावात भांडण, तंटे वाढले आहेत. त्यामुळे या योजनेला पुन्हा सक्रिय करणे गरजेचे झाले आहे.
....
गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे पोलिसांची आहे, त्याचप्रमाणे नागरिकांचीसुद्धा आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अडचणी असल्यास पाेलिसांशी संवाद साधावा तसेच गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तीची माहिती घ्यावी व काही गुन्हेगार प्रवृत्तीचे आढळल्यास लगेच पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
- आसिफराजा शेख, पोलीस निरीक्षक, पाेलीस ठाणे, कळमेश्वर.
....
१३ वर्षांपासून तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे. यात आमच्या गावाला पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. आमच्या गावातील तंटे गावातच सोडविले जातात. तंटामुक्त गाव माेहीम ही चांगली योजना आहे. योजनेत अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची असते. योजनेच्या परिपत्रकानुसार कामे केल्यास गावात तंटे होणार नाहीत व गाव तंटामुक्त राहील.
- मुकेश ढाेमणे, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, फेटरी