लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेमडेसिविरच्या धरतीवर ब्लॅक फंगस, तसेच अन्य अत्यावश्यक औषधांची काळाबाजारी करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत आणि पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले.
पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक शनिवारी घेतली. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत हेही तेथे पोहोचले. शहर पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शनची ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या भामट्यांना सापळे रचून अटक केली. त्यांच्यावर कडक कारवाई झाल्यामुळे आणीबाणीच्या स्थितीत रेमडेसिविरच्या काळाबाजारीला आळा बसला. आता ब्लॅक फंगस औषधांची काळाबाजारी सुरू आहे. त्याची दखल घेतली असून, रुग्णाचा जीव धोक्यात असताना, अत्यावश्यक औषधांची काळाबाजारी करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री राऊत यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही या संबंधाने शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना काळाबाजार करणाऱ्यांना कारवाईतून धडा शिकविण्याचे आदेश दिले.
---
गुन्ह्यांचाही आढावा
पोलीस आयुक्तांनी शहरातल्या पाचही झोनमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा, तसेच गुन्हेगारीचा पोलीस ठाणेनिहाय आढावा घेतला. ज्या भागात गंभीर गुन्हे घडत आहेत, त्या ठाणेदारांना चांगलेच धारेवर धरले. बेफिकिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही ठणकावून सांगितले.
----