लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पीओपी मूर्ती प्रतिबंधाबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या दिशानिर्देशाची अमरावती महापालिकेमध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर नागपूर महापालिकेने प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी प्रशासनाला दिले.
पीओपी मूर्ती निर्मिती, विक्री, भंडारण व आयात यासंदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या मागणीसंदर्भात प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती विरोधी कृती समितीद्वाो महापौरांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात समितीचे मुख्य संयोजक सुरेश पाठक, अखिल भारतीय प्रजापती कुंभार संस्थेचे सचिव चंदनलाल प्रजापती, हलबा समाज मूर्तिकार संघाचे मुख्य संयोजक ज्ञानेश्वर बारापात्रे, श्री संत गरोबा एकता मंडळाचे मुख्य संयोजक मनोज वरवाडे आदींचा समावेश होता.
पीओपी मूर्ती निर्मिती, विक्री, भंडारण व आयात यावर बंदी लावण्याचे मनपाला अधिकार आहेत. यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २ मे २०२० रोजी दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती विरोधी कृती समितीद्वारे यावेळी महापौरांना करण्यात आली.