प्रत्येक केंद्रावर आरोग्य पथक
भिवापूर : तालुक्यात तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दहा मतदान केंद्रावर यंत्रणा सज्ज आहे. ४० कर्मचारी व १० पोलीस कर्मचारी निवडणुकीच्या कामात कर्तव्य बजावणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता, प्रत्येक केंद्रावर आरोग्य पथक सज्ज असणार आहे.
तालुक्यात आलेसुर, मोखाबर्डी, पुल्लर या तीन ग्रामपंचायतीत प्रत्येकी तीन वाॅर्डात प्रत्येकी नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. एकूण २७ जागांवर ७३ उमेदवार रिंगणात आहेत. पुल्लर येथे २,२३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मोखाबर्डी येथे १,५५७ तर आलेसुरमध्ये १,७२६ मतदार अशा प्रकारे तिन्ही ग्रामपंचायतीत ५,५२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मोखाबर्डी ग्रामपंचायतीसाठी चार, तर आलेसुर व पुल्लरकरिता प्रत्येकी तीन मतदान केंद्र आहेत. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनासुद्धा मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांच्यासाठी शेवटच्या काही तासाची वेळ आरक्षित ठेवण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत कृषी अधिकारी रवींद्र राठोड आहेत. ठाणेदार महेश भोरटेकर यांनी सर्व मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे.