कामठी : शहरातील शुक्रवारी बाजार परिसरात हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असलेल्या तरुणास पाेलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. १०) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
प्रतीक ऊर्फ सोनू युवराज सहारे (२६, रा. भूषणनगर, रनाळा, ता. कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. ताे कामठी शहरातील शुक्रवारी बाजार परिसरात हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती नागरिकांनी पाेलिसांना दिली. त्यामुळे पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. पाेलिसांना पाहताच त्याने तिथूल पळ काढला. मात्र, पाेलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून ५०० रुपये किमतीची तलवार जप्त केल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई राजेश पाली,गयाप्रसाद वर्मा, प्रशांत सलाम, अंकुश पाटोळे, स्वाती चेटोळे यांच्या पथकाने केली.