खात : सूर नदीच्या पात्रात मित्रांसोबत दारू पिऊन पोहायला जाणे तांडा येथील युवकाला महागात पडले. यात प्रशांत संग्राम गेडाम (२४) याचा मृत्यू झाला. ३१ मे रोजी दुपारच्या सुमारास पाच मित्रांनी दारू पार्टी केली. नंतर नदीत पोहण्याचा बेत आखला. पाचही मित्र सूर नदीत पोहायला गेले. दारूच्या नशेत पोहत असताना प्रशांत याने गटांगळ्या टाकल्या. मित्रांनी त्याला पाण्याच्या बाहेर काढले. त्याच्या नाकातोंडात शिरलेले पाणी त्यांनी बाहेर काढले. प्रशांत याची आई आणि घरची मंडळी नातेवाइकाकडे गावाला गेले होते. त्यामुळे प्रशांतला घरी ठेवून त्याचे मित्र निघून गेले. याबाबत रात्रीच्या सुमारास कुणीतरी अरोली पोलीस ठाण्यात सूचना दिली. यावरून ठाणेदार अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार, राजू पुडके, संतोष महंत यांनी तांडा गाठले असता प्रशांत मृत अवस्थेत आढळून आला. यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रामटेक येथे हलविण्यात आला. मात्र त्याला वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले असते तर तो वाचला असता, असे सांगितले जात आहे. याप्रकरणी अरोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दारूच्या नशेत पोहणे जीवावर बेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST