लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : वानाडाेंगरी (ता. हिंगणा) नगर परिषद कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या १२० सफाई कामगारांना तीन महिन्यांपासून मासिक वेतन देण्यात आले नाही. हे कामगार कंत्राटदारामार्फत सेवा प्रदान करीत असून, त्यांनी मंगळवार (दि. ५) पासून काम बंद केले. कामगार नगर परिषद कार्यालयाच्या आवारात असतानाच कंत्राटदार कार्यालयात आला. त्यामुळे संतप्त कामगारांनी कंत्राटदाराला घेराव केला. कार्यालयात गाेंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने पाेलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
वानाडाेंगरी नगर परिषद प्रशासनाने शहराची साफसफाई आणि कचऱ्याची उचल करण्याचे कंत्राट असेंट बहुउद्देशीय संस्थेला दिले आहे. दिनेश ठाकरे हे या संस्थेचे पदाधिकारी आहेत. या संस्थेने यासाठी १२० सफाई कामगारांना नियुक्त केले आहे. कंत्राटदार संस्थेने या कामगारांना ऑक्टाेबर, नाेव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे मासिक वेतन दिले नाही. वारंवार मागणी करूनही वेतन न मिळाल्याने शेवटी त्यांनी काम करणे बंद केले.
दरम्यान, दिनेश ठाकरे बिलाची उचल करण्यासाठी नगर परिषद कार्यालयात आले असतानाच कामगारांनी त्यांना लगेच घेराव केला आणि वेतनाची मागणी करायला सुरुवात केली. दिनेश ठाकरे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पालिकेचे उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता व माजी सभापती तथा नगरसेवक आबा काळे यांनी त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लाेकप्रतिनिधींनी दिनेश ठाकरे यांना खडे बाेल सुनावल्याने त्यांची बाेलती बंद झाली. लाेकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर दुपारी सर्व कामगारांना त्यांच्या वेतनाचे धनादेश देण्यात आल्याने वाद मिटला. यावेळी एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे, माजी सरपंच सतीश शहाकर, गटनेता बालू मोरे, नारायण डाखळे हजर होते.
....
भविष्य निर्वाह निधीची समस्या
कंत्राटदार दिनेश ठाकरे यांनी नगर परिषद प्रशासनाकडून त्यांच्या बिलाची नियमित उचल केली असून, वेतन देण्यास मात्र मुद्दाम दिरंगाई केल्याचे उघड झाले आहे. दिवाळीच्या काळात त्यांनी कामगारांना वेतन न देता प्रत्येकी पाच हजार रुपयांचा ॲडव्हान्स दिला आणि वेळ मारून नेली हाेती. नियमानुसार कंत्राटदाराने या कामगारांच्या भविषय निर्वाह निधीच्या रकमेचा नियमित भरणा करणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदाराने वर्षभरापासून भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा भरणा केला नसल्याचे उघड झाले असून, पालिका अधिकाऱ्यांनी याला दुजाेरा दिला आहे.