- तिन वर्षापूर्वी वि.स. जोग यांनी केली होती मागणी : स्वा. सावरकर स्मारक समितीला पडला विसर
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या प्रशस्त इमारतीत तिन वर्षापूर्वी पार पडलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामाेदर सावरकर साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. वि.स. जोग यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात स्वा. सावरकर अध्यासन केंद्राची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर या मागणीविषयी कुठेच वाच्यता झालेली नाही. त्यामुळे ही मागणी कुठे बारगळली, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच स्वा. सावरकर स्मारक समितीलाच या मागणीचा विसर तर पडला नाही ना, अशी शंका उपस्थित व्हायला लागली आहे.
नागपुरात शंकरनगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर स्मारक समितीची स्थापना झाली होती. सावरकर विचार समाज आणि पुढच्या पिढीपर्यंत सातत्याने नेण्याच्या कार्याचाच हा एक भाग होता. त्या अनुषंगाने समग्र सावरकर साहित्यांवर विचार संशोधन व्हावे आणि त्यांचे भाषा, साहित्य, नाट्य, कविता, चिंतन, विज्ञान, अध्यात्म आदींचा अभ्यास भावी पिढीला करता यावा, या हेतूने नागपूर विद्यापीठामध्ये इतर अध्यासन केंद्र व विचारधारा विभागाप्रमाणेच सावरकर अध्यासन केंद्र व विचारधारा विभाग असावे, अशी मागणी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. वि.स. जोग यांनी तीन वर्षापूर्वी नागपुरात पार पडलेल्या सावरकर साहित्य संमेलनातून संमेलनाध्यक्ष या नात्याने केली होती. ही मागणी धरून समिती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. सपकाळ यांनाही भेटली होती. मात्र, त्यानंतर या मागणीबाबत साधा ब्र सुद्धा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे ही मागणी रेटून धरण्यात समितीलाच विसर पडला की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.
------------------
नागपूर विद्यापीठाने दिली होती पहिली डि.लिट.
नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पहिली डि.लिट. प्रदान केली होती. १४ ऑगस्ट १९४३ रोजी या पदवीची घोषणा करण्यात आली होती.
--------
साहित्य संमेलन, नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद
स्वा. सावरकरांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांचा साहित्य आवाका मोठा आहे. सोबतच मराठीला अनेक शब्द देण्यासोबतच इंग्रजीला पर्याय म्हणून अनेक मराठी शब्दांची निर्मिती करण्याचा मानही सावरकरांना जातो. त्यामुळे, विद्यापीठानेच सावरकर अध्यासन केंद्राबाबत पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र, वैचारिक मतभेदाच्या कचाट्यात पडायचे नाही, असा दंडक विद्यापीठ सातत्याने पाळत असल्याचे दिसून येते.
-----------
उद्धव ठाकरे सावरकरभक्त, त्यांनी पुढाकार घ्यावा
गेल्या सात वर्षापासून केंद्रात आणि राज्यात सावरकरांना मानणारे सरकार आहे. फडणवीस काळातच अध्यासन केंद्र होणे अपेक्षित होते. मात्र, आता सावरकरभक्त असलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांनीच नागपूर विद्यापीठात सावरकर अध्यासन केंद्राबाबत पुढाकार घेण्याची अपेक्षा आहे. कोरोना काळानंतर मी स्वत: याबाबत पाठपुरावा घेणार आहे.
- डॉ. वि.स. जोग, प्रसिद्ध साहित्यिक
------------------
विसर पडलेला नाही, कोरोनानंतर शिष्टमंडळ घेऊन धडक देऊ
आम्हाला आमच्या मागणीचा विसर पडलेला नाही. आम्ही विद्यापीठात गेलो होतो. त्यानंतर कोरोना संक्रमणाचा काळ आला आणि थांबलो आहोत. नागपूर विद्यापीठात सावरकर अध्यासन केंद्र व विचारधारा विभाग व्हावा, हा संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. लवकरच शिष्टमंडळ घेऊन विद्यापीठ आणि राज्यसरकारकडे धडक देऊ.
- चंद्रकांत लाखे, अध्यक्ष - स्वा. सावरकर स्मारक समिती, नागपूर
..............