नागपूर : कारण नसताना कंत्राटदाराचे बिल रोखून त्याची अडवणूक करणारे गांधीबाग झोनचे उप अभियंता ए.जी. वरंभे व ऐवजदाराकडून लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले हनुमाननगर झोनचे आरोग्य निरीक्षक संजय नगराळे यांना महापालिका प्रशासनाने मंगळवारी निलंबित करण्याचे आदेश काढले.गांधीबाग झोन भागात कंत्राटदार व्ही.एच. मुधोळकर यांना महापालिकेने आय ब्लॉक लावण्याची दोन लाखाची चार कामे दिली होती. २०१० मध्ये प्रशासनाने याबाबतचे कार्यादेश काढले होते. निर्धारित कालावधी संपण्यापूर्वीच मुधोळकर यांनी ही कामे पूर्ण केली. काम पूर्ण झाल्यांनतर त्यांनी झोनचे उपअभियंता वरंभे यांच्याकडे बिल सादर केले होते. परंतु मुधोळकर यांना बिल देण्यास ते टाळाटाळ करीत होते. दरम्यान मुधोळकर गंभीर आजारी पडले. उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांनी बिलासाठी वरंभे यांच्याकडे आग्रह धरला होता. परंतु त्यानंतरही त्यांना बिल मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी या संदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. तसेच कंत्राटदार संघटनेने या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती. बिलासाठी टाळाटाळ करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हर्डीकर यांनी वरंभे यांना निलंबित करण्याचे सोमवारी आदेश काढले. वास्तविक सामान्य प्रशासन विभागामार्फत बदली वा निलंबनाची कारवाई केली जाते. परंतु या प्रकरणात आयुक्तांनी स्वत: आदेश काढले आहे. (प्रतिनिधी)
बिल रोखणारा अभियंता व लाच घेणारा निरीक्षक निलंबित
By admin | Updated: November 4, 2015 03:13 IST