नागपूर : सध्या अॅन्टी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) ताब्यात असलेल्या नागपूर येथील उपवनसंरक्षक दीपक भट यांना मंगळवारी तडकाफडकी शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एसीबीने गत २९ मे रोजी भटकडून १९ लाख २५ हजार रुपये रोख जप्त केले होते. भटने ही सर्व अपसंपदा वनरक्षक व वनपालांच्या बदल्यांमधून लाचेच्या स्वरू पात स्वीकारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ३१ मे रोजी एसीबीने बर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, भटला अटक केली आहे. शिवाय सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. त्यानुसार सध्या भट एसीबीच्या ताब्यात आहे. वन विभागात वनरक्षक व वनपालांच्या बदल्यात मोठा गैरव्यवहार झाल्याची ओरड होती. यात भट यांनी मोठमोठ्या रकमा घेऊन बदल्या केल्याचा आरोप होता. यासंबंधी एसीबीचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्या होत्या. त्या आधारे एसीबीने भट यांच्यावर नजर ठेवून २९ मेच्या रात्री मोठी रोकड घेऊन पुण्याला जाण्याच्या तयारीत असताना धरमपेठेतील भोले पेट्रोलपंप शेजारच्या खाजगी बसस्थानकावर भटला ताब्यात घेतले होते. दरम्यान त्यांच्याजवळच्या दोन बॅगांची झडती घेतली असता, त्यामध्ये १९ लाख २५ हजारांची रोकड आढळून आली होती.
उपवनसंरक्षक भट निलंबित
By admin | Updated: June 3, 2015 02:35 IST