प्रतीक्षा संपली, आज होणार विजेत्यांची घोषणा : मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती नागपूर : तमाम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाचे ज्याकडे लक्ष लागलेले आहे तो लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण समारंभ आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. सहा झोनमधून निवडलेल्या १२ जणांच्या रेकॉर्डिंगची चाचणी मुंबईत संगीत क्षेत्रातील मान्यवर परीक्षकांकडून घेण्यात आली व त्यातून अंतिम दोन विजेते निवडण्यात आले. या विजेत्यांंच्या नावाची घोषणा शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित शानदार समारंभात केली जाणार असून या विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खा. कृपाल तुमाने, खा. नाना पटोले, खा. रामदास तडस, माजी मंत्री सुरेशदादा जैन, महापौर नंदा जिचकार, जळगावचे माजी महापौर रमेशदादा जैन यांच्यासह विदर्भातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिवार चाय प्रस्तुत या कार्यक्रमात सुफी संगीतातील बादशाह असलेला कैलाश खेर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असून तो यावेळी गोड स्वरांची बरसात करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यासुद्धा या कार्यक्रमात गाणार आहेत. पॉप्युलर आणि चित्रपट अशा दोन कॅटेगिरीतून दोन विजेत्यांची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना एक लक्ष रुपये सन्मान निधी, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्या दोन विजेत्यांना हा पुरस्कार मिळणार आहे ते दोन्ही विजेते या समारंभात आपल्या गायन कौशल्याचे सादरीकरण करणार आहेत. (प्रतिनिधी) मोजक्याच पासेस शिल्लक या कार्यक्रमाला रसिकांचा तुफान प्रतिसाद लाभत असून आता मोजक्याच पासेस शिल्लक राहिल्या आहेत. शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत या पासेसचे वितरण लोकमत सखी मंचच्या कार्यालयातून केले जाईल. लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्ट आणि लोकमत कॅम्पस क्लबच्या सदस्यांना ओळखपत्र दाखवून प्रत्येकी दोन नि:शुल्क पासेस दिल्या जातील. सोबतच लोकमतमध्ये प्रकाशित होणाऱ्या या कार्र्यक्रमाच्या जाहिरातीचे कटिंग आणणाऱ्यालाही दोन नि:शुल्क पासेस दिल्या जातील. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच कार्यालय- २४२३५२७, ५२८, ५२९ या क्रमांकावर संपर्क करता येईल.
सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण सोहळा आज
By admin | Updated: March 25, 2017 02:59 IST