लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नाईट ड्युटीवर जायला सांगितले म्हणून वृद्ध सुपरवायझरला मारहाण करून तीन मजुरांनी त्याची हत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य नगरात गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सम्हारू अवधू हरिजन (वय ६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. तो मूळचा खुरमाखास, रुद्रपूर (जि. देवरिया, उत्तर प्रदश) येथील रहिवासी होता. संजिवा या त्याच्या भाच्याने मेट्रोच्या वायरिंगचे कंत्राट घेतले होते. त्यामुळे २०१८पासून सम्हारू नागपुरात राहायला आला. कामावरील मजुरांची हजेरी लावून त्यांचे पगार काढण्याचे काम सम्हारू करायचा. त्याला मारहाण करणारे दिनेशकुमार मुन्ना लाला (वय २३), बजरंगी लालचंद्रप्रसाद गाैतम (वय २१) आणि सुशीलकुमार दीपचंद गाैतम (वय १९, तिघेही रा. मोहम्मदपूर पुहाया, जि. शहाजानपूर, उत्तर प्रदेश) या मजुरांसोबत सम्हारू लोकमान्य नगरातील झोपड्यात राहायचा. गांधीबागमध्ये त्यांचे काम सुरू होते. कंत्राटदाराचे वाहन त्यांना तेथून कामाच्या ठिकाणी नेऊन सोडायचे आणि परत घेऊन यायचे. गुरुवारी दिवसभर काम करून सर्व कामगार रात्री झोपड्यांवर परतले. स्वयंपाक करून जेवायचे आणि झोपायचे, या तयारीत असताना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सम्हारूने या तिघांनाही कामावर (नाईट ड्युटी)वर जाण्यास सांगितले. यावेळी थकूनभागून आताच कामावरून परत आल्याचे सांगून आरोपींनी नाईट ड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे सम्हारू त्यांच्यावर ओरडला. सम्हारू शिवीगाळ करत असल्याचे पाहून दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी त्याच्यासोबत वाद घालून त्याला मारहाण केली. आरोपी दिनेशकुमार याने जवळचा चाकू काढून सम्हारूच्या छातीवर वार केला. त्यामुळे सम्हारूचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, आरडाओरडा ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनीही पोलीस ठाण्यात येत माहिती घेतली. विक्रांत श्रीकिशन प्रसाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
---
जबलपूरला पळून जाणार होते
आरोपी दिनेशकुमार, बजरंगी आणि सुशिलकुमार हे जबलपूरला जाण्यासाठी बसमध्ये बसले. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी त्यांचे कॉल लोकेशन काढून त्यांना कामठी मार्गावर बसमधून ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
----