सुनिल केदारांची अडचण वाढणार; गुन्ह्याच्या कलमात वाढ!

By योगेश पांडे | Published: January 11, 2024 11:07 PM2024-01-11T23:07:58+5:302024-01-11T23:23:08+5:30

पोलिस न्यायालयाला अहवाल देणार : विनापरवानगी रॅलीतील दहाहून अधिक वाहने जप्त; इतर वाहनचालकांचा शोध सुरू

Sunil Kedar's problem will increase; Increase in crime! | सुनिल केदारांची अडचण वाढणार; गुन्ह्याच्या कलमात वाढ!

सुनिल केदारांची अडचण वाढणार; गुन्ह्याच्या कलमात वाढ!

नागपूर : जामीन मिळाल्यानंतर कारागृहातून बाहेर आल्यावर पोलिसांच्या परवानगीशिवाय रॅली काढणे काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना महागात पडणार असल्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात केदार व इतर आरोपींविरोधात आणखी एक गुन्ह्याचे कलम वाढविले आहे. त्याचप्रमाणे रॅलीत सहभागी झालेली दहाहून अधिक चारचाकी वाहने जप्त केली असून, इतर वाहनचालकांचा शोध सुरू आहे. आता पोलिसांकडून या प्रकाराचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा करणारे केदार यांना विविध कडक अटींसह हायकोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला होता. बुधवारी दुपारी कारागृहातून बाहेर पडल्यावर केदार यांनी समर्थकांसह शहरात शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत मोठ्या प्रमाणावर मोठ्या कार होत्या व त्यामुळे वाहतूक कोंडीदेखील निर्माण झाली होती. पोलिसांनी अगोदरच केदार समर्थकांना गर्दी करू नये, अशी सूचना देण्यात आली होती. तरीदेखील रॅली काढण्यात आली. पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेत केदार यांच्यासह जि. प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, रवींद्र चिखले, जि. प. उपाध्यक्ष कुंदा राऊत, जि. प. सभापती अवंतिका लेकुरवाळे, अनिल राय, संजय मेश्राम आणि विष्णू कोकड्डे यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. 

सुरुवातीला यात भादंविच्या कलम ३४१, १४३, १८८, मुंबई पोलिस कायदा कलम १३५, मोटार वाहन कायदा कलम १८४, १९४ आणि १७७ या कलमांचा समावेश होता. मात्र, त्यात कलम ‘१५३-अ’चा देखील समावेश करण्यात आला. धर्म, जात, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा आदींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सामाजिक सलोखा बिघडवणे अशा प्रकरणात हे कलम लावण्यात येते. संबंधित कलमांतर्गातील गुन्हा अजामीनपात्र आहे. त्याची धंतोली पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीत नोंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता केदार यांना पोलिस परत ताब्यात घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तपास करून न्यायालयाला कळविणार
परवानगी नाकारली असतानादेखील रॅली काढणे, कारागृहाच्या संवेदनशील भागात घोषणाबाजी करणे, वाहतुकीची कोंडी निर्माण करणे तसेच सामाजिक सलोखा बिघडविण्याचा आरोप केदार व त्यांच्या समर्थकांवर लागले आहेत. आता पोलिसांकडून यासंदर्भात कुठली पावले उचलण्यात येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. चौकशी झाल्यावर याचा विस्तृत अहवाल न्यायालयाकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे यांनी दिली.

गुन्हेगारांची वाहने किती?
५० पेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यात दाखल झालेल्या केदार यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी रॅली रोखून घोषणाबाजी करत वाहतूक विस्कळीत केली. कारागृहातून संविधान चौकात पोहोचत असताना वर्धा रोडवर सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांना अनेक वाहनांचे क्रमांक मिळाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १० ते १२ कार जप्त केल्या आहेत. तर आणखी १० कार तसेच त्यांच्या चालकांचा शोध सुरू आहे. या वाहनांच्या कागदपत्रांची तसेच मालकांची तपासणी करण्यात येत आहे. यात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तींची काही वाहने होती का, याची चौकशी सुरू आहे.
 

Web Title: Sunil Kedar's problem will increase; Increase in crime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.