नागपूर : अडीच हजार कोटी रुपयांची ‘मॅच फिक्स’ करणारा अन् दिल्ली पोलिसांनी मुसक्या बांधल्यानंतर प्रकाशझोतात आलेला नागपुरातील सर्वात मोठा बुकी सुनील भाटिया याच्या अखेर गुन्हेशाखेने मुसक्या बांधल्या. मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाटिया दडून बसला होता. तेथून गुरुवारी दुपारी त्याला जेरबंद केल्यानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने नागपुरात आणले आणि आज त्याचा कोर्टातून पीसीआर मिळवला. या कारवाईमुळे नागपूरसह मध्य भारतातील क्रिकेट सटोड्यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. राऊत अपहरण आणि खंडणी कांडाच्या कटात‘बड्या बुकीची भूमिका’ असल्याचे वृत्त ‘लोकमत‘ने २ मार्चला प्रकाशित केले होते. त्याच दिवशी पोलीस पथक भाटियाला जेरबंद करण्यासाठी मुंबईला रवाना झाले होते, हे विशेष !बुकी अजय राऊत याचे अपहरण केल्यास तगडी रक्कम मिळणार, असे भाटियाने सांगितले होते. त्यामुळे राऊतचे अपहरण करून पावणेदोन कोटींची खंडणी वसूल केल्याची कबुली कुख्यात गँगस्टर राजू भद्रे आणि त्याचा राईट हॅण्ड कुख्यात दिवाकर कोतुलवारने दिली होती. नागपुरातील आतापर्यंतची सर्वात मोठी खंडणी ठरलेले हे प्रकरण भाटियाच्या डोक्यातून निघालेल्या कल्पनेमुळेच घडल्याचे स्पष्ट झाल्यामुळे गुन्हेशाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी भाटियाला दोन आठवड्यांपूर्वी चौकशीसाठी बोलवून घेतले. शर्मा यांनी भाटियाची स्वत:च झाडाझडती घेतली. त्यावेळी त्याने दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी भाटियाला मोकळे करण्यात आले. दरम्यान, पीसीआरच्या चौकशीत भद्रे, कोतुलवारने दिलेली माहिती आणि भाटियाने दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्याने भाटियाचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले. त्यातून या प्रकरणात भाटिया जुळला असल्याची पोलिसांना खात्री पटली.लोकमतचे वृत्त अन् ...बुधवारी २ मार्चला ‘लोकमत‘ने या अपहरणाचा कट कुठे अन् कसा शिजला, त्याचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले. एका मोठ्या बुकीने भद्रे टोळीला करोडोंची खंडणी देऊ शकणाऱ्या ‘सावजांची’ नावे सांगितल्याचेही या वृत्तात नमूद केले. त्याच दिवशी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी गुन्हेशाखेचे एक पथक भाटियाला जेरबंद करण्यासाठी मुंबईला रवाना केले. विलेपार्लेच्या एका हॉटेलमध्ये भाटिया मुक्कामी होता. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास भाटियाला पोलिसांनी हॉटेलमध्ये ताब्यात घेतले. त्यानंतर दुरांतो एक्स्प्रेसने पोलीस पथक भाटियाला घेऊन आज सकाळी नागपुरात पोहचले. भाटियाला दुपारी कोर्टात हजर केल्यानंतर त्याचा ११ मार्चपर्यंत पीसीआर मिळवला
सुनील भाटिया गजाआड
By admin | Updated: March 5, 2016 03:00 IST