लोकमत सखी मंचचा पुढाकार : २०० हून अधिक सखींनी लुटला आनंदनागपूर : पाळण्यावरील झोके, पाण्यात संगीताच्या तालावर मनसोक्त भिजणे अन् सोबतीला संगीतखुर्चीसारखा भन्नाट खेळ. लोकमत सखी मंचच्या पुढाकारातून लहानपणी अनुभवलेल्या या सर्व गोष्टींचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात लुटण्याची संधी उपराजधानीतील सखींना ‘संडे का फन डे’ या सहलीतून मिळाली व त्यांनी यातील क्षण अन् क्षण ‘एन्जॉय’ केला. लोकमत सखी मंचच्या वतीने रविवारी काटोल मार्गावरील अंबिका फार्महाऊस येथे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २०० सखींसाठी ‘संडे’ हा खऱ्या अर्थाने ‘फन डे’ ठरला.रविवारी सकाळी ९ च्या सुमारास चार बसेसमधून सखींचा प्रवास सुरू झाला. उपराजधानीपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या अंबिका फार्महाऊस येथे पोहोचेपर्यंत सखींनी अंताक्षरी, गाण्याच्या भेंड्यासारखे खेळ रंगविले. निसर्गसौंदर्याने नटलेल्या व चहूबाजूने टेकड्या असलेल्या अंबिका फार्महाऊसच्या नयनरम्य परिसरात पोहोचल्यावर सखींच्या उत्साहाला आणखी उधाण आले. नाश्ता झाल्यावर सखींनी थेट जवळील ‘वॉटरपार्क’कडे मोर्चा वळविला. येथील स्विमींग टँक, स्लायडिंग येथे सर्वच सखींनी धम्माल केली. ज्या तरुणी व महिलांना पाण्याची भीती वाटत होती, त्यांनीदेखील पाण्याचा मनसोक्तपणे आनंद लुटला. येथे सर्वच महिलांची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक जणी तर प्रथमच ‘वॉटरपार्क’ला आल्या होत्या. त्यामुळे पाण्यात खेळण्याचा आनंद अन् नवलाई यांमुळे उत्साह द्विगुणित झाला. यानंतर अंबिका फार्महाऊस येथे परतल्यानंतर सखींनी संगीताच्या तालावर स्वच्छंदपणे ‘रेन डान्स’ केला. अगदी १८ वर्षांच्या तरुणींपासून ते जेष्ठ नागरिक असलेल्या आजींपर्यंत सर्वांनीच धम्माल मजा केली. मनसोक्त खेळल्यानंतर झालेल्या लज्जतदार व गरमागरम जेवणाचे सर्वच सखींनी कौतुक केले. जेवण झाल्यावर लगेच धावपळ नको म्हणून सखींनी हौजी खेळण्यास सुरुवात केली. यानंतर तर त्यांच्यासाठी लहानपणी अनुभवलेल्या आठवणीत परत जगण्याची संधीच त्यांना मिळाली. पाळण्यावर झोके घेणे, खेळण्यांवर हुंदडणे आणि लहानशा झुकझुकगाडीवर सैर करणे याचा आनंद त्यांनी अक्षरश: लहान मुलांसारखा लुटला. दुपारनंतर संगीतखुर्ची, वन मिनिट गेम शो, अंताक्षरी यात तर सखींनी धम्माल केली. सकाळपर्यंत अनोळखी असलेल्या महिला सायंकाळी अगदी घनिष्ट मैत्रिणी झाल्या होत्या व ‘व्हॉट्सअॅप’च्या माध्यमातून फोटो, नंबर व मॅसेजेसचे आदान-प्रदान सुरू होते. यावेळी काही सखींचे वाढदिवसदेखील साजरे करण्यात आले. सायंकाळी इच्छा नसतानादेखील सखींना घरांकडे परतावे लागले, परंतु ‘संडे का फन डे’ सर्वच सखींना एक मौलिक आठवण देऊन गेला. लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी निरनिराळ्या खेळांचे संचालन केले व सखींमध्ये नवा उत्साह भरला. या सहलीप्रसंगी अंबिका फार्महाऊस येथील संचालक महेंद्रसिंह नेगी, शम्मी ममतानी, शेखर काकवानी यांच्यासोबतच टीमलीडर अतुल सराफ, अधिता हेडाऊ, निशा वानखेडे, दियाना सोलोमन, रुपाली पाटील, मिलींद यांचे विशेष सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
अंबिका फार्महाऊस येथे ‘संडे का फन डे’
By admin | Updated: October 17, 2014 01:05 IST