फ्रेण्ड्स कॉलनीतील प्राध्यापकाला मारहाण प्रकरण : न्यायालयात दोषारोपपत्र दाखल नागपूर : शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर व त्याच्या गँगविरुद्ध अॅट्रॉसिटीसह मकोका अंतर्गत विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. आरोपी सुमित ठाकूरने गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी फ्रेण्ड्स कॉलनी प्रेरणानगर येथील प्राध्यापक मल्हार मस्के यांच्या घरासमोर ठेवलेल्या त्यांच्या कारला धडक देऊन नुकसान केले होते. याबाबत त्यांनी त्याला जाब विचारला असता आपल्या साथीदराला आणून मस्के यांना जातीवाचक शिवीगाळ करीत लोखंडाच्या रॉडने व दांड्यांनी मारहाण केली होती. त्यांच्या घरांच्या खिडकीचे काच आणि सामानांची तोडफोड करीत चार लाखाचे नुकसान केले होते. आरोपींमध्ये सुमित ठाकूर (३०), त्याचा भाऊ अमित ठाकूर, राजकुमार ठाकूर, विनयकुमार राजेंद्र प्रसाद पांडे, शेख शहनवाज ऊर्फ शानू शेख अमिन (मोमिनपुरा), मो. अलमिजान कुरेशी, शेख शहबाज ऊर्फ पप्पू शेख मुबारक, योगेश विनोदकुमार सिंह, नीलेश अशोक उके, मनोज प्रकाश शिंदे, अतुल रुपराव शिरभाते याचा समावेश आहे. यापैकी सुमित, अमित, योगेश सिंह आणि मनोज हे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठीत आहेत तर आरोपी राजकुमार, विनयकुमार, नीलेश आणि अतुलच्या विरुद्ध मकोका न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट जारी केले आहे. हे चारही आरोपी फरार आहेत. तर शेख शहनवाज, मो. अलमीजान, शेख शहबाज याच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने न्यायालयाला अहवाल सादर करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
सुमित ठाकूरविरुद्ध मकोका
By admin | Updated: January 23, 2016 03:06 IST