पारशिवनी : घरी कुणीच नसताना विष प्राशन करून विवाहित महिलेने आत्महत्या केली. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नेऊरवाडा येथे शनिवारी (दि. २) दुपारच्या सुमारास घडली.
शीतल नरेंद्र कंकाळे (वडिलांकडील नाव शीतल दिलीप दाढे २५, रा. नेऊरवाडा) असे मृत महिलेचे नाव असून, ती माहेरी वास्तव्यास हाेती. शनिवारी सकाळी शीतल भाऊ व वडिलांसाेबत शेतात कामाला गेली हाेती. दुपारी दोन वाजताच्या सुमारास ती एकटीच घरी परत आली हाेती. दरम्यान, तिला बाेलावण्यासाठी तिची चुलत बहीण घरी गेली असता, शीतल उलटी करताना दिसून आली. लगेच तिने ही माहिती शीतलच्या वडिलांना भ्रमणध्वनीद्वारे दिली. लागलीच तिला गावकऱ्यांच्या मदतीने नवेगाव खैरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी तिला मृत घाेषित केले. तिच्या ताेंडाला वास येत असल्याने तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे. तीन महिन्यांपूर्वी शीतलचा घटस्फाेट झाला हाेता. त्यामुळे ती माहेरीच राहत हाेती. तिने वडिलांच्या घरीच आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.