नागपूर : नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अनेक महिलांच्या मनात जन्म घेते; परंतु बहुतेक महिलांचे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरत नाहीत. काही महिला मात्र याला अपवाद ठरतात. त्या पाऊल पुढे टाकतात आणि जिद्द, परिश्रम व चिकाटीच्या बळावर उंच भरारी घेतात. शहरातील अशीच एक कर्तृत्ववान महिला आहे, नेहा संजीव भावसार. त्यांनी सुखा मेवा व्यवसाय ‘फिजिकल’पासून सुरू करून ‘ऑनलाइन’पर्यंत पोहोचवला आहे.
नेहा भावसार एमबीए (मार्केटिंग) पदवीधारक असून त्यांना ‘फूड बिजनेस’मध्ये रुची आहे. या व्यवसायाशी संबंधित कंपनीत त्यांनी पाच वर्षे काम केले; परंतु स्वत:च्या बळावर व्यवसाय करण्याचे स्वप्न मनात घर करून असल्यामुळे त्या नोकरीत त्यांना मानसिक समाधान मिळाले नाही. त्यांनी नोकरी सोडून सुका मेवा विक्री व्यवसाय सुरू करण्याविषयी कुटुंबियांसोबत चर्चा केली. पतीने लगेच समर्थन दिले आणि त्या कामाला लागल्या. काही वर्षांपूर्वी त्यांनी केवळ ३० हजार रुपये गुंतवून व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी पतीसोबत दुकानादुकानांमध्ये जाऊन व ग्राहकांना भेटून सुका मेवा विकला. किंमत व दर्जाच्या बाबतीत सर्वांचे समाधान झाल्यामुळे त्यांच्या व्यवसायाने गती पकडली. त्यांचा व्यवसाय आता वटवृक्षामध्ये रूपांतरित होत आहे. त्यांनी आता हा व्यवसाय ऑनलाइन व्यासपीठावर आणण्यासाठी वेबसाइट तयार केली आहे. सदर वेबसाइट लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे. याशिवाय नेहा यांची सुका मेव्याशी संबंधित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचीही योजना आहे. त्यांचे ही योजना प्रत्यक्षात उतरवण्याचे कामदेखील सुरू आहे. त्यांना ८ वर्षांची मुलगी असून त्या आईचे कर्तव्य पूर्ण करून हा व्यवसाय सांभाळत आहेत.
-------------
आधी छोटे पाऊल टाका
कोणताही व्यवसाय करताना आव्हाने स्वीकारावी लागतात. व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांनी आधी छोटे पाऊल पुढे टाकावे. त्यानंतर हळूहळू पुढे जाऊन आपल्याला हवे ते लक्ष्य गाठावे; परंतु व्यवसाय पुढे नेण्यासाठी जिद्द व चिकाटीची गरज असते हेदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे, असे नेहा भावसार यांनी महिलांना संदेश देताना सांगितले.