राव गोंदियात, जैन वर्धेला: जोशींकडे गोसेखुर्दनागपूर : नागपूर विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूरचे उपजिल्हाधिकारी आर.एन.जैन यांची वर्धा येथे तर विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त केएनके राव यांची गोंदियात बदली झाली आहे. गोंदियाचे डी.व्ही. सावरकर हे राव यांची जागा घेणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून विभागातील महसूल खात्यातील बदल्यांकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. कोणाच्या बदल्या होणार आणि कोण थांबणार याचीही चर्चा रंगत होती. ९ तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयाने विभागातील ११ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार गोंदियाचे उपविभागीय अधिकारी डी.व्ही. सावरकर यांची नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर बदली झाली आहे. सावरकर यांच्या जागेवर नागपुरातील उपायुक्त के.एन.के. राव जाणार आहेत. उपजिल्हाधिकारी आर.एन. जैन (पेंच प्रकल्प २) यांची उपजिल्हाधिकारी वर्धा येथे बदली झाली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नागपूरचे सचिव अजय रामटेके यांची चंद्रपूर येथे उपजिल्हाधिकारी (अतिरिक्त) या पदावर बदली झाली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनिता मेश्राम यांची उपजिल्हाधिकारी भंडारा या पदावर तर राजेंद्र अहिवर यांची आर्वीचे उपविभागीय अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भंडाऱ्याचे उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी यांची बदली नागपूर येथे उपजिल्हाधिकारी (गोसेखुर्द-२) या पदावर झाली आहे. भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी एस.डी. कुळमेथे यांची बदली चंद्रपूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर झाली आहे.वर्धेचे उपजिल्हाधिकारी (उर्ध्व वर्धा प्रकल्प) एम.एच. टोणगावकर यांची उपविभागीय अधिकारी कुरखेडा येथे, कुरखेड्याचे उपविभागीय अधिकारी आर.बी. खजांजी यांची उपजिल्हाधिकारी चंद्रपूर येथे तर गोंदियात सध्या उपजिल्हाधिकारी (रोहोयो) म्हणून कार्यरत जयप्रकाश अंबादे यांची सेवा त्यांच्या मूळ विभागाकडे प्रत्यावर्तीत करण्यात आली आहे.बदल्यांची आणखी एक यादी जाहीर होण्याची शक्यता असून त्याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यात तीन वर्षापेक्षा अधिक काळ घालविणारे काही अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत. त्यांची नावे पहिल्या यादीत नाही. हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: June 11, 2014 01:15 IST