लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखेर जिल्हा परिषद शाळेतील खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय रखडलेला होता. यावर्षीच्या अर्थसंकल्पात जि.प. ने विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी पहिल्यांदाच तब्बल ४५ लाखाची तरतूद केली आहे. यापैकी विद्यार्थी संख्येनुसार केवळ ३९ लाख रुपयेच लागणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु अद्यापपर्यंत हा निधीच शाळा स्तरावर वळता करण्यात आलेला नाही, परंतु याबाबत शिक्षण व वित्त सभापती भारती पाटील यांनी आज गुरुवारी “लवकरच हा निधी शाळा स्तरावर वळाता करुन २६ जानेवारीपूर्वी विद्यार्थ्यांना गणवेशाची पूर्तता करण्यात येईल” अशी ग्वाही दिली.
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत जि.प. शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एससी, एसटी, बीपीएल प्रवर्गातील मुले तसेच सर्व मुलींना मोफत गणवेश दिल्या जातो. परंतु यामध्ये ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश नसतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होते. यंदा या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शिक्षण व वित्त सभापती भारती पाटील यांनी ४५ लक्ष रुपयांची तरतूदही केली. अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सभापती भारती पाटील व सीईओ योगेश कुंभेजकर यांनी या विषयाला गांभीर्याने घेत कोरोनाच्या संकटकाळातही या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधी उपलब्ध करुन देत, ग्रामीण पालकांना दिलासा देण्याच्या प्रयत्न केला आहे. आज या प्रवर्गातील १३ हजार विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते.