जिल्हा परिषद : सलग तिसऱ्या वर्षी तंबाखू मुक्ती अभियान नागपूर: कॅन्सर व रोगापासून नवीन पिढीला मुक्ती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागाने सलग तिसऱ्या वर्षी व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचा निश्चय केला आहे. विद्यार्थी व नागरिकांत जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी २६ जूनला विद्यार्थी तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.दोन वर्षांपूर्वी या अभियानाला सुरुवात करण्यात आली. जि.प.च्या १५७० शाळा व ४२५ आरोग्य व उपकेंद्रांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. २६ जून २०१३ रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. नवीन पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी मार्गदर्शन तसेच ग्रामीण भागात जागृती मोहीम हाती घेतली आहे. सोबतच तंबाखू खाणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन व रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी निरंतर आरोग्य शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दृकश्राव्य माध्यमातून माहिती देणे, बॅनर , भिंतीपत्रके व हस्तपत्रकांच्या माध्यमातून प्रसार व प्रचार केला जात आहे.या उपक्र मात जिल्हा परिषदेचे शिक्षक, आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर, खंडविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी,अंगणवाडी सेविका, मदतनीस व स्वयंसेविकांमार्फत अभियान राबविले जात असल्याचे चिखले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तंबाखू आरोग्यास हानीकारक असूनही अज्ञानापोटी अनेक लोक या व्यसनाच्या आहारी जातात. यात ६ ते १४ वयोगटातील बालकांचाही समावेश असतो. त्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून मुक्त करण्याचा संकल्प जि.प.ने केल्याची माहिती चिखले यांनी दिली.(प्रतिनिधी)
विद्यार्थी करणार व्यसनमुक्तीचा निश्चय
By admin | Updated: June 26, 2014 00:48 IST