वाडी : मित्रांसाेबत गिट्टीच्या खाणीच्या खड्ड्यातील पाण्यात पाेहायला उतरलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वडधामना शिवारात शनिवारी (दि. २) दुपारी घडली.
अतुल तानसिंग शेंद्रे (वय १६, रा. नारायण नगर, वडधामना, ता. नागपूर ग्रामीण) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अतुल सामान्य घरातील असून, दवलामेटी (ता. नागपूर ग्रामीण) येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात एमसीव्हीसीच्या इयत्ता अकरावीचा विद्यार्थी हाेता. वडधामना शिवारात गिट्टीची खाण असून, खाणीच्या खड्ड्यात पाणी साचले असल्यााने तरुण त्या खड्ड्यात पाेहायला उतरतात. अतुल त्याच्या मित्रांसाेबत याच खाणीच्या खड्ड्यात शनिवारी दुपारी पाेहायला उतरला हाेता. पाेहताना ताे खाेल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब लक्षात येताच मित्र लगेच त्याच्या मदतीला धावले. त्यांनी अतुलला पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी वाडी येथील हाॅस्पिटलमध्ये आणले. मात्र, डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. या घटनेमुळे वडधामना येथे शाेककळा पसरली हाेती. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.