खंडविकास अधिकाऱ्यास मारहाण
By admin | Published: May 30, 2015 02:52 AM2015-05-30T02:52:58+5:302015-05-30T02:52:58+5:30
ग्रामसभेला अधिकारी पाठविण्याची विनंती करूनही अधिकारी न पाठविल्यामुळे संतापलेल्या धानला येथील ग्रामस्थांनी खंडविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्याला मारहाण केली.
मौदा : ग्रामसभेला अधिकारी पाठविण्याची विनंती करूनही अधिकारी न पाठविल्यामुळे संतापलेल्या धानला येथील ग्रामस्थांनी खंडविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्याला मारहाण केली. मौदा पंचायत समिती कार्यालयात हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडला. मारहाणीत खंडविकास अधिकाऱ्यांच्या डोक्याला दुखापत झाली.
चिंधू विठोबा आदमने असे जखमी झालेल्या खंडविकास अधिकाऱ्यांचे तर एस.जे. पाटील असे विस्तार अधिकाऱ्यांचे नाव आहे. शुक्रवारी धानला ग्रामपंचायतीची सभा होती. या सभेला सचिव दर्शना संदीप गायकवाड या सुटीवर असल्याची जाणीव असल्याने सरपंच अशोक पत्रे यांनी खंडविकास अधिकारी आदमने यांच्याकडे कुणीतरी अधिकारी सभेला पाठविण्यासंदर्भात निवेदन मंगळवारीच दिले होते. सभेची नियोजित वेळ निघून गेली तरीही एकही अधिकारी सभास्थळी आलेला नव्हता. त्यानंतर सरपंचांनी खंडविकास अधिकाऱ्यांना फोन करून विचारणा केली असता पाच-दहा मिनिटात अधिकारी येत आहे, अशी टाळाटाळ केली. पुन्हा काही वेळानंतर विचारले असता तेच उत्तर मिळाले. तोपर्यंत सभास्थळी मोठ्या संख्येने धानला येथील ग्रामस्थ एकत्र आले होते. अधिकारी येण्याची सूतराम शक्यता नसल्याचे पाहून सरपंच पत्रे यांनी सभा सुरू केली. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ही सभा संपून २५५ नागरिकांनी प्रोसेडिंग बुकवर सह्या केल्या. या सभेतही अधिकाऱ्यांविरुद्ध नागरिकांमध्ये संताप दिसून आला.
सभा संपल्यानंतर लगेच २५-३० ग्रामस्थांनी मौदा पंचायत समिती गाठले. खंडविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन सरपंच पत्रे यांनी झालेल्या सभेची माहिती देत कॅशबुक, हिशेबात गोंधळ असल्याचे खंडविकास अधिकाऱ्यांना सांगत चौकशी करण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना दिले.
मात्र खंडविकास अधिकाऱ्यांनी त्या निवेदनाची प्रत त्यांच्यासमोरच फाडून फेकली. त्यामुळे धानला येथून आलेल्या ग्रामस्थांमध्ये असलेला असंतोष उफाळला आणि त्यांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यात खुर्च्या, टेबलची नासधूस केली तर साहित्य इतरत्र फेकले. तसेच खंडविकास अधिकारी आदमने आणि विस्तार अधिकारी पाटील यांना धक्काबुक्की केली. त्यात खंडविकास अधिकाऱ्यांच्या डोक्याला दुखापत झाली. याबाबत खंडविकास अधिकाऱ्यांनी मौदा पोलीस ठाण्यात धानल्याचे सरपंच अशोक पत्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य, माजी सरपंच अजय हारोडे यांच्यासह २५-३० महिला पुरुषांविरुद्ध तक्रार नोंदविली.