वाडी : सर्वात प्रथम आमची कोविड चाचणी करून द्या, असा धाक दाखवीत दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. वाडी येथील बाल संगोपन उपकेंद्रात हा प्रकार घडला. तिघांनी केलेल्या या मारहाणीत आरोग्यसेवक रजनीश शंकर गोलाईत हा जखमी झाला आहे. याप्रकरणी वाडी पोलिसांनी आशिष ऊर्फ छोटू बच्चन झा, संकेत भाकरे, शुभम मिश्रा यांना अटक केली आहे.
वाडी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने भाजीपाला, दूध विक्रेते, किराणा दुकानात काम करणारे कर्मचारी आणि व्यावसायिकांची कोविड चाचणी करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी बाल संगोपन उपकेंद्र येथे मंगळवारपासून संबंधित लोकांची कोविड चाचणी करण्यासाठी कक्ष उभारला आहे. गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास येथे उपरोक्त आरोपी पोहोचले. त्यांनी प्रथम आमची तपासणी करून द्या म्हणत तिथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्याला धाक दाखवीत वाद घातला. तसेच आरोग्य कर्मचारी रजनीश गोलाईत आणि एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात गोलाईत यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जखम झाली. संबंधित घटनेची माहिती मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी लागलीच पोलिसांना दिली. याचदरम्यान जखमी कर्मचाऱ्याला मेयो रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. केंद्रावरील उपस्थित कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनाही दिली. यासोबतच केंद्रावर पोलीस सुरक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. दरम्यान, याप्रकरणी वाडी पोलिसांनी उपरोक्त आरोपीवर भादंविच्या कलम ३५३, ३३२, ३३६, २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करीत अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करीत पोलिसांनी २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळविला.