सुनील चरपेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारने जीनोम संपादित तांदळाच्या दोन वाणांना परवानगी दिली आहे. हायब्रिड कापसाची उत्पादकता व उत्पादन घटक असून, खर्च वाढत असल्याने उत्पादन घेणे कठीण झाले आहे. बियाण्यांचे उत्पादन मर्यादित असून, वापर वाढत असल्याने काळाबाजार होत आहे. हा काळाबाजार थांबविण्यासाठी कापसाचे सरळ वाण उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.
जगात बीटी कापसाचे सरळ वाण वापरले जाते. सन २०१५ पासून भारतीय शेतकऱ्यांना बीटी कापसाचे सरळ वाण उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. कृषी निविष्ठांचा वापर व दर वाढले असून, मजुरांची कमतरता व वाढलेल्या मजुरीमुळे उत्पादनखर्च वाढला आहे. उत्पादन व उत्पन्न कमी होत आहे. घन व अतिघन लागवडीमुळे बियाण्यांचा वापर प्रतिएकर दोन पाकिटांवरून तीन ते सहा पाकिटांवर गेला आहे.
देशात बियाण्यांचे उत्पादन मर्यादित असल्याने तुटवडा निर्माण होऊन काळाबाजार होत आहे. प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे चोरून विकले जात असल्याने तुटवडा लक्षात येत नाही. हायब्रिड बियाण्यांमध्ये बीटी जनुके पूर्ण क्षमतेने सक्रिय होत नसल्याने गुलाबी बोंडअळीचा धोका व नुकसान कायम आहे. या बाबी सरळ वाणामध्ये टाळल्या जात असल्याचे संशोधन व वापरावरून सिद्ध झाले आहे, अशी माहिती विजय जावंधिया यांनी दिली.
सीआरवाय-१ एसी जनुकांचा वापर का नाही?पेटेन्ट अॅक्टनुसार सीआरवाय-१ एसी (एमओएन-५३१) या जनुकाची रॉयल्टी २०१२ मध्ये संपुष्टात आणि हे जीन रॉयल्टीमुक्त झाले. याच जीनचा वापर जीनोम संपादित तांदळाचे दोन वाण विकसित करण्यासाठी केला आहे. मग याचा वापर आजवर कापूस बियाण्यांमध्ये का केला नाही, याचे उत्तर कुणीही देत नाही.
"सरळ वाणासाठी बियाणे कंपन्यांना शेतकऱ्यांकडून रॉयल्टी हवी आहे. सरकार याला परवानगी देत नाही. हायब्रिड बियाणे हाय इल्ड नसून, खते, पाणी याला हाय रिस्पॉन्स आहे."- विजय जावंधिया, कृषितज्ज्ञ.