विकास कामे बंद करा, आरोग्यावर खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:07 AM2021-04-14T04:07:12+5:302021-04-14T04:07:12+5:30

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण, मृत्यूचा वाढता आलेख यामुळे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना चिंता भेडसावत आहे. अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे ...

Stop development work, spend on health | विकास कामे बंद करा, आरोग्यावर खर्च करा

विकास कामे बंद करा, आरोग्यावर खर्च करा

Next

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण, मृत्यूचा वाढता आलेख यामुळे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना चिंता भेडसावत आहे. अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी शहरात यावे लागत आहे. त्यामुळे विकास कामे वर्षभर झाली नाहीत तरी चालेल, पण आरोग्य यंत्रणा सक्षम करा, विकास कामांचा निधी आरोग्यावर खर्च करा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय सदस्यांकडून होत आहे.

जिल्ह्यात ७० हजाराच्या जवळपास लोकांना कोरोनाची लागण झाली असून, मृत्यूचा आकडा १३०० च्या जवळपास पोहचत आहे. गावच्या गावे पॉझिटिव्ह निघत आहेत. गंभीर रुग्णांना थेट शहरात आणावे लागत आहे. शहरातील रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ३०० च्यावर उपकेंद्र आहेत. ग्रामीण रुग्णालयसुद्धा आहे. पण गंभीर रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णाला पूर्णपणे शहरातील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. या महामारीच्या परिस्थितीत ही व्यवस्था बळकट करण्याची जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मागणी आहे.

- वर्षभर नाली, रस्त्याची कामे बाजूला ठेवा

वर्षभर नाली, रस्त्याची कामे झाली नाही तरी काही फरक पडत नाही. माणसे जगणे महत्त्वाची आहे. त्यामुळे विकास कामाचा सर्व निधी कोरोनाच्या नियंत्रणासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणाऱ्यावर खर्च केला पाहिजे, अशी भावना सदस्यांची आहे.

- प्रशासनाने फक्त शासनाचे आदेश अमलात आणले

कोरोनाला वर्षभराचा कालावधी झाला आहे. पण प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या नाही. बहुतांश वेळ बैठकांमध्ये घालविला. आरोग्यव्यवस्था बळकट करण्यासाठी कोणताही आराखडा तयार केला नाही. प्रशासन फक्त शासनाचे आदेश तेवढेच अमलात आणल्याची भावना व्यक्त होत आहे.

- सदस्यांच्या भावना अगदी बरोबर आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी १५ एप्रिलला बैठक घेऊन काय करता येऊ शकते, यावर चर्चा करू.

रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प.

Web Title: Stop development work, spend on health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.