योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : डिप्टी सिग्नल पुलाखाली अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याचा बनाव चांगलाच पेटला व जमावाने दगडफेक करत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर पोलिसांना धक्काबुक्की केली व शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डिप्टी सिग्नल परिसरात मोटारसायकलस्वार महेंद्र फटिंग या तरुणाचा खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाल्याच्या प्रकरणामुळे राजकारण तापले. पोलिसांनी अपघाताची सीसीटीव्हीच्या माध्यमातून चौकशी केली असता संबंधित तरुणाचा पारडी उड्डाणपुलावर अपघात झाला होता व त्याच्या वडिलांनी डिप्टी सिग्नल पुलाखाली घसरून अपघात झाल्याची खोटी तक्रार केली असल्याची बाब समोर आली. दरम्यान, त्याचा मृत्यू डिप्टी सिग्नलजवळ झाला नसतानादेखील काही लोकांनी जाणुनबुजून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला.
३० ते ४० लोकांनी तरुणाचा मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुलाखाली अडविली व आंदोलन सुरू केले. तसेच रस्ता रोको सुरू केला. पोलिसांनी शांत होण्यास सांगितले असता काही जणांनी पोलिसांनाच धक्काबुक्की केली. तसेच दगडफेक करत मालमत्तेचे नुकसान केले व वाहनांच्या काचादेखील फोडल्या. या प्रकरणाची सत्यता समोर आल्यानंतर पोलिसांनी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात उमाकांत अग्निहोत्री, रविनीश पांडे, भरत साळवे, शिव दयाराम बनपाले, वसंत सहारा, अतुल राघवर्ते, पप्पू निशाद, कश्यप मशरू, रितीश शाहू, महेश सुभाष यादव, राजा भवानी, भूषण सिलोठिया, लोकेश बनपेला यांचा समावेश आहे. या आरोपींविरोधात बीएनएसच्या कलम १२६(२), १३२, १८९ (१), १९०, १९१ (१), १९२, ३२४ (४), ३५१, ४९, ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.